पाकिस्तानच्या संसदेत अनेकदा वादग्रस्त विधानं केली गेल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. खासदारांनी एकमेकांवर आक्षेपार्ह टीका केली आहे. पण सध्या पाकिस्तानच्या संसदेतील एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका महिला खासदाराने सभागृहाच्या अध्यक्षांकडे केलेल्या मागणीचा हा व्हिडीओ आहे. ज्यामुळे पाकिस्तानच्या संसदेतील या व्हिडीओची चर्चा होत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री आणि पाकिस्तानी नेत्या झरताज गुल यांनी सभागृहाचे अध्यक्ष सरदार अयाझ सादिक यांना भाषणा दरम्यान एक विनंती केली. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
झरताज गुल सभागृहात भाषण करत असताना अध्यक्ष सादिक हे आपल्या कामात व्यस्त होते. हे पाहून गुल यांनी अध्यक्षांना आपल्या डोळ्यात डोळे रोखून बघावे, अशी मागणी केली. मी बोलत असताना तुम्ही माझ्याकडे पाहा, अशी विनंतीच त्यांनी अध्यक्षांकडे केली.
“राहुल गांधींचे भाषण म्हणजे स्टँडअप कॉमेडी…”, खासदार कंगना रणौत, रवि किशन यांची टीका
झरताज गुल म्हणाल्या, “माझ्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, बोलताना डोळ्यात डोळे रोखून बोलले पाहिजे. तुम्ही जर माझ्यापासून नजरा चोरत असाल तर मला भाषण करणे अवघड होईल. मला दीड लाख लोकांनी मते देऊन निवडून दिले आहे. जर तुम्ही माझ्याकडे कानाडोळा करणार असाल तर मला बोलता येणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा चष्मा घाला आणि माझ्याकडे पाहा.”
अध्यक्ष सरदार सादिक यांनी मात्र महिला खासदाराच्या या मागणीला नम्रपणे नकार दिला. ते म्हणाले, “मी तुमचे भाषण ऐकतोय. पण तुमच्याकडे पाहू शकत नाही. महिलेकडे रोखून पाहणे बरे दिसत नाही.” यावर खासदार गुल म्हणाल्या की, जर तुम्ही ५२ टक्के महिलांना अशाप्रकारे दुर्लक्षित करणार असाल तर सभागृहात केवळ मोजकेच लोक पोहचू शकतील. यावरही सरदार सादिक यांनी हजरजबाबी वृत्तीने उत्तर देताना सांगितले की, तरीही मी कोणत्याही महिलेकडे रोखून पाहणार नाही.
सोशल मीडियावर या संभाषणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. एक्सवर लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. एका युजरने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, अध्यक्ष महोदयांची विनोद बुद्धी जबरदस्त आहे. तसेच त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने न बघण्याचे कारणही सांगितले.
आणखी एका युजरने म्हटले की, आपण आर्थिकदृष्ट्या खचलेलो आहोत. राजकीय अस्थिरता जाणवत आहे. तरीही खासदार आपला अंदाज सोडत नाहीत. तर आणखी एकाने म्हटले, “दरम्यान पाकिस्तानच्या संसदेत हे चालूये…”
कोण आहेत झरताज गुल?
झरताज गुल या माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात होत्या. ऑक्टोबर २०१८ ते एप्रिल २०२२ दरम्यान त्यांनी हवामान बदल या खात्याचे राज्यमंत्रीपद भूषविले होते. तसेच पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभागृहात त्या यावर्षी डेरा गाझी या मतदारसंघातून पुन्हा निवडून आल्या आहेत.