भारतीय रेल्वेची तक्रार थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पोहचली आहे. पालम स्टेशनवर चेतक एक्स्प्रेसचा थांबा करण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे विनंती केली होती. मात्र त्यांच्याकडून दखल न घेतल्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनेने थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून आपली तक्रार वजा विनंती केली आहे. कित्येक वर्ष निघून गेली मात्र आमची मागणी मान्य झाली नाही, यावर तुम्ही काहीतरी करा अशी विनंती रेल्वे प्रवासी संघटनेने ट्रम्प यांच्याकडे ट्विटरवर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे प्रवासी संघटनेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, चेतक एक्सप्रेस (12981- 12982) चा पालम येथे थांबा करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी ,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि रेल्वे मंत्रालयाकडे या मागणीबाबत प्रस्ताव पाठविला. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. चेतक एक्स्प्रेस दररोज दिल्लीतील सराय रोहिल्लाहून राजस्थानमधील उदयपूरला जाते. सराय रोहिल्लानंतर चेतक एक्स्प्रेस दिल्ली कँट रेल्वे स्टेशनवर थांबते. त्यानंतर गुरुग्रामला थांबा आहे. त्यामुळे रोज रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवासी संघटनेच्या लोकांनी पालम स्टेशनवर दोन मिनिटे चेतक एक्स्प्रेस थांबावी, अशी मागणी केली आहे. पंतप्रधान, रेल्वे मंत्रालय आणि केजरीवाल यांना याबाबत सतत पत्र पाठवले मात्र, त्यांच्याकडून कानाडोळा करण्यात आला. शेवटी प्रवाशांनी सोशल मीडियाद्वारे आपली विनंती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे केली आहे.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palam station chetak express stop donald trump letter