सोनेखरेदी करण्यासाठी आता तुमच्याकडे पॅनकार्ड असणे बंधनकारक करण्यात येण्याची शक्यता आहे. देशाच्या अर्थिक नियामक मंडळाने नुकताच याविषयीचा एक प्रस्ताव सादर केला. यामध्ये सोने खरेदी कऱण्यासाठी तुम्हाला तुमचे पॅनकार्ड दाखवावे लागणार असल्याचे म्हटले आहे. यामध्येही २ लाखांहून अधिक किंमतीचे सोने खरेदी करायचे असल्यास पॅनकार्ड सादर करावे लागू शकते. करचोरी रोखण्यासाठी दैनंदिन रोखीच्या मर्यादेला मंजुरी देण्यात यावी, असा प्रस्ताव समितीने सरकारला दिला आहे.

मागील वर्षी या समितीची केंद्र स्तरावर स्थापना करण्यात आली. देशातील अर्थिक व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. तरुण रामादुराई हे या समितीचे अध्यक्ष आहेत. याशिवाय या समितीमध्ये रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, सिक्युरीटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि यांसारख्या अनेक महत्त्वाच्या संस्थांतील तज्ज्ञांचा समावेश आहे.

बेकायदा सोनेखरेदीला यामुळे लगाम बसेल असे या नियामक मंडळाचे म्हणणे आहे. अशाप्रकारे पॅनकार्ड लिंक केल्याने सोन्याच्या व्यवहारांचीही योग्य पद्धतीने नोंद राहणे शक्य होईल. सोन्याच्या व्यवहारांमध्ये होणाऱ्या करचोरीबाबत कोणतीही नोंद उपलब्ध नाही. त्यामुळे करचोरी रोखण्यासाठी या सर्व गोष्टींची योग्य पद्धतीने नोंद असणे आवश्यक आहे. याशिवाय करापासून सुटका करुन घेणाऱ्यांसाठीही कडक नियम असण्याची शक्यता आहे असे समितीचे म्हणणे आहे.

Story img Loader