Nagin Chappal By Pandharpur Man: आपल्यासहीत आजूबाजूच्या प्रत्येकाकडे एकदा बारकाईने पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येकाला कुठल्यातरी गोष्टीचा छंद असतोच. अशी एक गोष्ट जिच्यासाठी ते आपली तहान भूक, संपत्ती सगळं पणाला लावू शकतात, अशी एक गोष्ट जी कितीही दुःख असलं तरी त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते, अशी एक गोष्ट जी त्यांना मनापासून करावीशी वाटते. अशाच एका छंदाची कहाणी आज आपण पाहणार आहोत. पंढरपूरच्या चांगदेव दानवे यांच्या चप्पल प्रेमाची ही कहाणी आहे. ११ व्या वर्षापासून त्यांना विविध प्रकारच्या चप्पला घालण्याची आवड होती आणि ती आवड जपताना त्यांनी अत्यंत वेगळ्या धाटणीच्या चप्पला गोळा करण्याची सुरुवात केली होती. दानवे यांची तब्बल २५ हजार रुपये किमतीची नागीण चप्पल ही त्यांच्याकडील कलेक्शनमधील सर्वात खास जोड आहे, असे त्यांनी लोकसत्तासह संवाद साधताना सांगितले.
चांगदेव दानवे हे पंढरपूर तालुक्यातील एका गावात ते ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून काम करतात. याशिवाय त्यांनी काही चित्रपटांमध्ये सुद्धा भूमिका केल्या आहेत. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांना चप्पलांचा छंद जडला होता व आता त्यांचे वय ६४ इतके आहे. लहानपणी तब्बल १५ रुपयांना त्यांनी चप्पला विकत घेतल्या होत्या तर आता त्यांच्याकडे एक ११ हजाराची, एक १३ हजाराची व एक तब्बल २५ हजाराची चप्पल सुद्धा आहे. यातील २५ हजार रुपयांची किंमत ही नागीण चप्पल म्हणून ओळखली जाते. या चप्पलेला तब्बल १०० घुंगरू जोडले आहेत तसेच तब्बल ७ नागाचे फणे यावर आहेत. चप्पलेचं वजन तब्बल ६ किलो आहे. दानवे यांनीच या चप्पलेला नागीण चप्पल असं नाव दिलंय.
चांगदेव दानवे सांगतात की, मी इतकी वर्षं ही चप्पल वापरतोय मला याचा कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही, ना कधी यामुळे पाय दुखले ना गुडघे दुखले जना कंबर दुखली. माझ्या या चप्पलांच्या प्रेमाला घरच्यांनी सुद्धा खूप पाठिंबा दिला आहे.
काय मग मंडळी, तुम्हाला दानवेंची ही भन्नाट ‘नागीण चप्पल’ कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा.