Pandharpur Viral Video : पंढरपूरमधील प्रसिद्ध श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येत असतात. तासनतास रांगेत उभं राहून दर्शन घेतल्यानंतर भाविक पंढरपुरातील इतर प्रसिद्ध मंदिरांनाही भेटी देत असतात. अशाचप्रकारे पंढरपूरमधील गोपाळपूर येथील प्रसिद्ध गोपाळपूर कृष्ण मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांकडून पैसे घेत असल्याचा एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पैसे न दिल्याने मंदिराबाहेर बसलेल्या एका महिला पुजाऱ्याने दर्शनासाठी मंदिरात प्रवेश नाकारला. या संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कार्तिकी एकादशी निमित्ताने अनेक भाविक पंढरपुरात दर्शनासाठी दाखल झाले होते. ज्यामुळे पंढरपुरातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी भाविक गोपाळपुरात श्रीकृष्ण मंदिरातील संत जनाबाईंचा संसार पाहण्यासाठी पोहोचले. परंतु, येथे जाणाऱ्या भाविकांकडून एक महिला पुजारी पैशांची मागणी करत असल्याचे दिसत आहे. तसेच महिलेने अरेरावीची भाषा करत पैसे न दिल्याने एका भाविकाला प्रवेश देण्यास नकार दिल्याचेही समोर आले आहे. देवाच्या दारात स्थानिक पुजाऱ्यांकडून सुरू असलेला पैशांचा बाजार पाहून भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
त्यामुळे गोपाळपुरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून जबरदस्तीने पैसे घेऊन मगच दर्शनासाठी सोडणाऱ्या पुजाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी संतप्त भाविकांकडून केली जात आहे.