Paneer Viral Video : पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या पनीरची मोठ्या प्रमाणात विक्री होते. पण, पनीरमध्ये भेसळ होत असल्याच्या अनेक घटना रोज समोर येत आहेत. लोकांचे पनीरची आवड लक्षात घेऊन, पनीरपासून बनविले जाणारे अनेक पदार्थ आपल्याला विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये खायला मिळतात. पण, तुम्ही खात असलेलं पनीर चांगलं आहे की बनावट हे ओळखायचं कसं हे जाणून घेणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक जण ब्रेड पकोड्यात वापरलेल्या पनीरची लाइव्ह टेस्टिंग करताना दिसतोय. त्याद्वारे तो खाद्यविक्रेते पनीरच्या नावाखाली लोकांना कशा प्रकारे बनावट पनीर खायला देतायत हे सांगतोय.

व्हिडीओमध्ये एक जण विकत घेतलेल्या ब्रेड पकोड्यातील पनीर काढून दाखवताना दिसतोय. त्यानंतर त्यानं ते पनीर तपासण्यासाठी कोमट पाण्यानं स्वच्छ धुतलं. मग त्यावर आयोडिन टिंक्चर टाकलं, ज्यामुळे ते पनीर काळं पडलं.

त्यानंतर त्यानं याच पद्धतीनं पनीरचा दुसरा तुकडा तपासला; पण यावेळी पनीरचा तुकडा काळा पडला नाही. त्या व्यक्तीच्या मते, पनीरचा जो तुकडा काळा झाला, तो बनावट होता आणि ज्या तुकड्यावर काहीच परिणाम झाला नाही, ते खरं पनीर होतं.

पनीर ब्रेड पको़डा क्वालिटी चेकचा हा व्हिडीओ @nikhilspreads नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका सोशल मीडिया युजरनं लिहिलं की, लोक ३० रुपयांचा पनीर ब्रेड पकोडा मोठ्या आवडीनं खातात, आता ३० रुपयांत त्यांना बनावट पनीर नाही, तर काय मिळेल? दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, ही टेस्टच मला चुकीची वाटतेय; बनावट चीजबद्दलचं सत्य अशा प्रकारे कळू शकत नाही. तिसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, २५ रुपयांच्या ब्रेड पकोड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात चीज पाहून तुम्हाला समजेल की, दया दाल में कुछ काला है! शेवटी एकानं लिहिलं की, याचा अर्थ असा की, आता २५ रुपयांचा ब्रेड पकोडा खाण्यापूर्वी २०० रुपयांची ही बाटली खरेदी करावी लागेल आणि जर पनीर चांगलं निघालं, तर पनीरही वाया जाईल.

Story img Loader