विमानांमध्ये काहीतरी घडणे आणि त्यामुळे गोंधळ उडणे नेहमीचेच. कधी अचानक विमान गळायला लागले म्हणून तर कधी विमानात गर्दी झाली म्हणून विमानप्रवास अनेकदा गाजताना दिसतो. अशाचप्रकारची एक घटना नुकतीच घडली असून विमानात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असणारे ऑक्सिजन मास्क अचानक खाली आल्याने प्रवाशांमध्ये काहीवेळ गोंधळ उडाला होता. एअर एशियाच्या विमानाबाबत घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाहून इंडोनेशियाला जाणारे एअर एशियाचे विमान सुमारे ३५००० फूट उंच आकाशात झेपावले होते. अशावेळी अचानक विमानातील ऑक्सिजन मास्क विमानातून खाली पडायला लागले. विमानातील केबिनमधील प्रेशर कमी झाल्याने ऑक्सिजन मास्क खाली आल्याची माहिती एअर एशियाकडून देण्यात आली. यानंतर विमान १०००० फूट खाली घेण्यात आले. त्यानंतर हे विमान पर्थ येथे उतरवण्यात आले.
टेक ऑफ केल्यानंतर साधारण २५ मिनिटांत हा सगळा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्येही एकच खळबळ उडाली होती. एअर एशियाच्या स्टाफकडूनही विमानाचे इमरजन्सी लॅन्डिंग होत असल्याचे प्रवाशांना सागंण्यात आले. यावेळी प्रवाशांनी घाबरु नये आणि लँडिंगसाठी तयार राहावे असे सांगण्यात आले. या विमानात सुमारे १५१ प्रवाशी होते. हा अनुभव अत्यंत भयंकर आणि हृद्याचा ठोका चुकवणारा होता अशी प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिली. मात्र विमानातील कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सावरले. त्यामुळे आम्ही बचावलो आणि सुखरुपपणे विमान लँड झाले असेही अनेकांनी सांगितले.