इंटरनेटवरचे तमाम होतकरू कलाकार, गायक मंडळी किंवा सेलेब्रिटी आणि अगदी राजकारण्यांचं फेसबुक लाईव्ह जाम लाडकं ठरलंय. तुम्ही कोणीही असाल, कुठेही असाल पण जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुमच्या मनातलं तुम्ही सगळ्या जगापुृढे मांडू शकता.तेसुध्दा लाईव्ह. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना फेसबुक स्वत: सांगेल की तुमच्या ओळखीची/ ओळखीचा हा उभरता सितारा आता लाईव्ह आहे. कोणाचाही बर्थडे असेल तर फेसबुक लाईव्ह असायलाच पाहिजे. कुठल्या धिनचॅक ठिकाणी गेला आहात? फेसबुक लाईव्ह आॅन करत सांगा अख्ख्या जगाला. गेलं वर्षभर फेसबुक लाईव्ह सगळीकडे छा गया था.
[jwplayer EgsawSD5]
पण अशा या तुफान फेमस फेसबुक लाईव्हला फेसबुकचाच मिळणारा सपोर्ट कमी होतोय असं वृत्त आहे. ‘फेसबुक लाईव्ह’ एेवजी हाय डेफिनिशन व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिसमध्ये शिरत आर्थिक फायदा मिळवण्यासंबंधी फेसबुकच्या व्यवस्थापनात विचार चालू असल्याचं कळतंय. ‘नेटफ्लिक्स’ सारखी अॅप्स हाय डेफिनिशन मूव्ही स्ट्रीमिंगच्या माॅडेलवर जगभर बक्कळ पैसा कमवत आहेत. भारतातही हाॅटस्टार सारख्या स्ट्रीमिंग सर्व्हिसेस चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. त्यामुळे या प्रकाराचं फेसबुकलाही अट्रॅक्शन वाटलं तर नवल नाही. पण त्यासाठी फेसबुक लाईव्ह बंद करणार?
२०१६ साली फेसबुकवर कोट्यवधी लाईव्ह व्हिडिओज् अपलोड झाले. यात सामान्य माणसांसोबतच अनेक सेलेब्रिटींचा समावेश होता. फेसबुक लाईव्ह सर्व्हिस लाँच होत असताना फेसबुकने अनेक स्टार्सना तसंच पब्लिशर्सना लाईव्ह फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ करण्यासाठी मोठमोठ्या रकमा दिल्या, काँट्रॅक्ट्स केले. पण हे काँट्रॅक्ट्स एका वर्ष पूर्ण झाल्यावर फेसबुकने पुन्हा नव्याने केलेले नाहीत. त्यामुळे फेसबुक आता ‘लाईव्ह’पासून दूर जात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
२०१४ मध्ये एका जागतिक परिषदेत फेसबुकचा सीईओ मार्क झकरबर्ग याने पाच वर्षांनी फेसबुकच्या बऱ्याच सर्व्हिसेस बहुतेककरून व्हिडिओच्याच रूपात यूझर्सना वापरायला मिळतील असं जाहीर केलं होतं. २०१६ मध्ये फेसबुक लाईव्ह लोकप्रिय झाल्यावर जगभरातल्या नेटयूझर्सनी यावर उड्या मारल्या होत्या. पण आता पेड डिजिटल स्ट्रीमिंगच्या ‘आकर्षक’ क्षेत्रात फेसबुक उतरून ‘फेसबुक लाईव्ह’ चा टप्प्याटप्प्याने बळी जाणार की काय अशी भीती व्यक्त होते आहे.