Papad Selling Boy Video: असे म्हटले जाते, पालक श्रीमंत असोत किंवा गरीब, जर ते त्यांच्या मुलांना चांगले संस्कार आणि आदर्श देऊ शकत नसतील तर त्यांचे पालकत्व यशस्वी होत नाही. संस्कार आणि आदर्श हे पालकांकडून मुलांना मिळणारी मोठी ठेव असते; कारण या गोष्टी आयुष्यभर त्यांच्याबरोबर असतात. जर ते करण्यात पालक चुकले तर मुलांना त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात.
सध्या सोशल मीडियावर पापड विक्रेत्या मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात दमणमधील समुद्रकिनाऱ्यावर पापड विकणाऱ्या एका लहान मुलाच्या एका व्यक्तीबरोबरच्या व्हिडीओने नेटकऱ्यांना भावूक केले आहे.
हा भावनिक व्हिडीओ @younickviraltrust नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात पापड विक्रेत्या मुलाने “मी अजून पापड विकू शकलो नाही” असे एका व्यक्तीला सांगितले आणि त्याने व्यक्तीला त्याच्याकडून पापड विकत घेण्याची ऑफर दिली.
“मी काम करतो, पण भीक मागत नाही”
व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पापड विक्रेत्या मुलाला काही गोष्टींवरून प्रश्न विचारताना दिसतेय. तो मुलाला पापडाच्या किमतीबाबत विचारतो, ज्यावर तो मुलगा उत्तर देतो की, पापडाच्या एका पॅकेटची किंमत ३० रुपये आहे. जेव्हा त्या व्यक्तीने ते पॅकेट पाच रुपयांना विकत दे अशी ऑफर दिली तेव्हा तो मुलगा कचरला, पण काही सेकंदात त्याने होकार दिला. यावेळी त्या व्यक्तीने अचानक त्या मुलाला ५०० रुपये देऊन आश्चर्यचकित केले. पण, मुलाने स्वाभिमानाने पैसे घेण्यास नकार दिला आणि म्हटले की, “मी काम करतो, पण भीक मागत नाही.”
यावेळी त्याचा स्वाभिमान पाहून व्यक्तीने त्या मुलाला आईसाठी पैसे स्वीकारण्याची विनंती केली, पण तो मानण्यास तयार झाला नाही, पण थोडी समजूत काढल्यानंतर मुलगा सहमत झाला. सध्या तो मुलगा आणि त्या व्यक्तीमधील संवादाने सोशल मीडियावरील युजर्स प्रभावित झाले आहेत. यावेळी पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी त्यांचे विचार शेअर केले आहेत.
एका युजरने व्हिडीओवर कमेंट करत म्हटले आहे की, “वय नाही, जबाबदारी माणसाला मोठं करते.” दुसऱ्याने लिहिले की, “वाह, वाह मित्रा, काय बोललाय हा मुलगा.” तिसऱ्याने लिहिले, “राज्य किंवा केंद्र सरकार कृपया त्याला चांगला अभ्यास करण्यास मदत करा, त्या लहान मुलाला आयएएस व्हायला हवे.” तर शेवटी एकाने लिहिले की, “तुझे विचार खूप चांगले आहेत, जर सर्वांनी असा विचार केला असता तर कोणीही चोरी केली नसती.”