जगात किती आर्श्चायात टाकणा-या गोष्टी आहेत ना! आता हेच बघा फ्रान्समध्ये असा एक रस्ता आहे जो दिवसातून दोनदा पूर्णपणे गायब होतो. जगात सगळ्यात धोकादायक मानल्या जाणा-या रस्त्यापैकी हा एक आहे. तसे अनेक रस्ते धोकादायक आहेत पण फ्रान्समधला हा रस्ता त्या सगळ्याहूनही अधिक धोकादायक मानला जातो. फ्रान्सच्या पश्चिम किना-यावर Passage du Gois हा सागरी मार्ग आहे. या भागात सतत भरती येत असल्याने दिवसातून दोनदा हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली जातो त्यामुळे येथे काही मिनिटांपूर्वी रस्ता होता असे सांगितले तर कोणालाही यावर विश्वास बसणार नाही.
वाचा : बर्म्युडा ट्रँगलपाशी तयार झालं रहस्यमयी बेट
१७ व्या शतकापासून या सागरी सेतूचा दळणवळणासाठी वापर केला जात आहे. समुद्राला ओहोटी आली की एका ठराविक वेळेत या मार्गावरून गाड्या जातात. चार किलोमीटरहून अधिक लांबीचा हा सागरी सेतू आहे .यावरून जाणा-या गाड्या समुद्राला भरती आली की मध्येच अडकतात, अशा घटना इथे अनेकदा घडतात त्यामुळे लोकांना वाचवण्यासाठी येथे खास टॉवर आणि सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहे. भरतीच्यावेळी या रस्त्यावर १५ फूटांच्या आसपास पाणी साचते. रस्ता जरी समोर पाहताना सुरक्षित वाटत असला तरी ब-याचदा डोळ्याची पापणी लवते न लवते तोच हा रस्ता पाण्यासाठी अदृश्य होऊन जातो. अचूक अंदाज बांधता न आल्याने चालक समुद्राच्या मध्ये अडकतो. भरतीच्यावेळी पाण्याचा वेगही इतका असतो की गाडी तर वाहून जाण्याची शक्यता तर असतेच पण एखाद्याच्या जीवावरही हे बेतू शकते. त्यामुळे याला जगातील सगळ्यात धोकादायक रस्ता ही मानतात. इथल्या स्थानिकांना भरतीच्या वेळा ठाऊक आहेत त्यामुळे अपघात होण्याचे प्रकार क्वचितच घडतात. असा हा गायब होणारा रस्ता पाहण्यासाठी अनेक पर्यटक फ्रान्सचा पश्चिम किना-यावर येतात.
वाचा : ११ वर्षांच्या अर्णवचा बुद्धयांक स्टीफन हॉकिंग यांच्यापेक्षा जास्त!