भोपाळहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानात एक अजब प्रकार घडला आहे. प्रवाशाने खाण्यासाठी इडली-सांबार मागवले असताना त्यात झुरळ निघाले. या प्रकरणी प्रवाशाने तक्रार केल्यानंतर सरकारी एअरलाईन कंपनी असलेल्या एअर इंडियाने प्रवाशाची माफी मागितली. ही माफी कंपनीने एका ट्विटद्वारे मागितली असून, आमच्या प्रवाशाला खराब अनुभव आल्याने आम्ही माफी मागतो असे म्हटले आहे. रोहित राज सिंह चौहान असे या प्रवाशाचे नाव असून त्याने हा अनुभव आल्यानंतर शनिवारी रात्री ट्विट करत या घटनेची माहिती दिली. यामध्ये त्याने आपण ऑर्डर केलेल्या पदार्थात आलेल्या झुरळाचा फोटोही अपलोड केला होता.

या घटनेची आम्ही त्वरीत नोंद घेतली असून भोपाळ ते मुंबई या मार्गावरील विमानांसाठी असलेल्या केटररला कडक नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही एअरलाईन्सने कळवले आहे. आमचे वरिष्ठ अधिकारी या प्रवाशाच्या संपर्कात असल्याचेही एअरलाईन्सने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. एकूणच प्रवाशांच्या बाबतीत अशाप्रकारे निष्काळजीपणा दाखवणे कंपनीच्या अंगाशी येणारे आहे. तसेच अशा गोष्टींमुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका असून कंपनी प्रवाशांचा विश्वास गमावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

 

Story img Loader