सध्या उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. ती म्हणजे एका व्यक्तीने केवळ २० रुपयांसाठी एका गरीब रिक्षा वाल्याला भररस्त्यात २ मिनिटात येतो असं सांगितलं आणि त्याचे पैसे बुडवून तो पळून गेला. मात्र, रिक्षावाला आपल्या कष्टाच्या २० रुपये घेऊन तो व्यक्ती येईल म्हणून त्याची वाट पाहत खूप वेळ उभा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, हजरतगंज येथील जनपथ मार्केटमध्ये सायकल रिक्षात बसून एक व्यक्ती आला, ज्यावेळी रिक्षावाल्याचे पैसे द्यायची वेळ आली तेंव्हा तो, “माझाजवळ पैसे नाहीत २ मिनिटे थांबा, मी येतो,” असं सांगून तो प्रवासी निघून गेला. यानंतर रिक्षाचालक तिथेच उभा राहून तो प्रवासी परत येण्याची वाट पाहत राहिला. पण २ मिनिटांची २० मिनिटं झाली तरीही तो प्रवासी परत आलाच नाही. पण तो प्रवासी येईल आणि आपले २० रुपये देईल या आशेने रिक्षावाला मात्र तिथेच उभा होता. या घटनेबाबतची माहिती @raksha_s27 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे.
हेही पाहा- धावत्या घोड्याचा Video शेअर करत आनंद महिंद्रांनी दिला मोलाचा संदेश; म्हणाले “तर तुम्ही पाण्यावरही…”
रिक्षावाल्याचा फोटो पोस्ट करत ट्विटच्या कॅप्शनमध्ये वापरकर्त्याने लिहिलं आहे की, हजरतगंजच्या जनपथ मार्केटमध्ये ही व्यक्ती त्याच्या रिक्षात बसलेल्या व्यक्तीची वाट पाहत आहे जो त्याला, ‘इथे थांब, मी २ मिनिटांत येतो असं म्हणाला आणि २० मिनिटे झाली तरी तो आला नाही.’ शेवटी रिक्षावाला पैसे न घेताच गेला, पैसे बुडवणारा माणूस किती खालच्या थराला गेला असेल.’ असं ट्विटमध्ये लिहिलं आहे.
हे ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी पैसे बुडवणाऱ्या व्यक्तीच्या कृत्याचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने हे लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने कर्म प्रत्येकाचा हिशोब चुकता करते, असं लिहलं आहे. दुसऱ्या व्यक्तीने, यावरून माणुसकीची घसरलेली पातळी दिसून येत असल्याची कमेंट केली आहे. अनेकांनी कोणत्याही कष्टकरी व्यक्तीचे पैसे बुडवू नका असं म्हटलं आहे.