Indigo Flight Viral Video : विमानाने प्रवास करीत असाल, तर साहजिकच तुम्हाला कोणत्याही प्रकारची अस्वच्छता वा घाण सहन होणार नाही. कारण- विमानातून प्रवास करण्यासाठी आपण बस, रेल्वेपेक्षा तीन पट अधिक पैसे मोजलेले असतात. त्यामुळे विमानातील प्रवासात चांगल्या सेवा-सुविधा या मिळाल्याच पाहिजेत, अशी प्रवाशांची अपेक्षा असते. अशा परिस्थितीत विमानातील फूड एरियामध्ये झुरळ दिसल्यास कोणालाही आरोग्याबाबतची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. अशाच प्रकारे ‘इंडिगो’ने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला जेवणाभोवती चक्क झुरळ फिरताना दिसण्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. त्याने सोशल मीडियावर या संदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे.
तरुण शुक्ला नावाच्या युजरने इंडिगो विमानातील या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडीओ एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर केला आहे. या व्हिडीओत इंडिगो विमानातील फूड एरियामध्ये त्याला अनेक झुरळे सर्वत्र रेंगाळत असल्याचे दिसतेय. व्हिडीओ शेअर करीत त्याने लिहिले की, विमानाच्या फूड एरियात आणि इतर ठिकाणी झुरळांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. हे फार भयंकर आहे. इंडिगो एअरलाइन्स याकडे बारकाईने लक्ष देईल आणि हे कसे घडले याची चौकशी करील, अशी आशा आहे.
g
सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एकाच वेळी अनेक मोठी झुरळे सर्वत्र फिरत आहेत. त्याशिवाय एका कोपऱ्यात खूप घाण पडलेली आहे. हा खरोखरच धक्कादायक व्हिडीओ आहे. या पोस्टवर इंडिगोनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. इंडिगोने या घटनेबाबत प्रवाशाची माफी मागितली; शिवाय त्यानंतर संबंधित विमानातील फूड एरिया स्वच्छ केला असल्याचे सांगितले.
दरम्यान, विमानातील या किळसवाण्या प्रकरणानंतर आता सोशल मीडियावरही अनेक जण संताप व्यक्त करीत आहेत. अनेकांनी इंडिगोच्या विमान सेवेवर प्रश्चचिन्हे उपस्थित केली आहेत. तसेच ही विमान कंपनी प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेत नसल्याचेही काहींनी म्हटले आहे.