आपण ज्या परिसरात वावरतो तो स्वच्छ आणि सुंदर ठेवणे अगदीच महत्त्वाचे असते. काही प्रवासी असे असतात, जे सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर इथे-तिथे कचरा फेकून न देता कचराकुंडीत टाकतात आणि आपण जबाबदार नागरिक आहोत हे दाखवून देतात. तर आज एक्स (ट्विटर) वर अशीच एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या युजरचे नाव सौरभ असे आहे. सौरभ आणि त्यांच्या मित्रांनी प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये एक खास गोष्ट केली, हे पाहून उत्तर रेल्वे आणि रेल्वे अधिकारी अनंत रूपनगुडी यांनीदेखील कमेंटमध्ये या तरुणांचे कौतुक केले आहे.
काही दिवसांपूर्वी युजर त्यांच्या पाच मित्रांबरोबर फिरायला गेला होता. या पाच मित्रांनी दरभंगा ते दिल्ली ( Darbhanga to Delhi) असा ट्रेनने प्रवास केला. प्रवास करताना त्यांनी त्यांच्याबरोबर एक प्लॅस्टिकची बॅग ठेवली आणि त्याच्यात प्रवासादरम्यान बाटली किंवा काही खाद्यपदार्थांचा कचरा या बॅगेत ठेवला. त्यानंतर दिल्लीला पोहचल्यावर त्यांनी हा सर्व कचरा स्टेशनवरील कचरा कुंडीत टाकला. त्यांचा हा छोटासा प्रयत्न केवळ ट्रेन आणि ट्रॅक स्वच्छ राहण्यासाठी नव्हता, तर ट्रेन स्वच्छ करणाऱ्या कामगारांचीदेखील त्यांनी नकळत मदत केली आहे, असे त्यांनी कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.
हेही वाचा…तुम्हाला मोमोज खायला आवडतात का? फॅक्टरीमध्ये कसा तयार होतो तुमचा आवडता पदार्थ, पाहा VIRAL VIDEO
पोस्ट नक्की बघा :
प्रवाशांनी दिला स्वच्छतेचा धडा :
एक्स (ट्विटर) अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात युजर आणि त्यांच्या मित्रांचा एक सेल्फी आणि प्रवासादरम्यान त्यांनी जमा केलेला कचरा एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवला आहे, याचासुद्धा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच हा खास अनुभव त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिला आहे. त्यानंतर युजरने लिहिले की, कचरा उचलणे ही काही मोठी गोष्ट नाही. पण, काही जण ट्रेनच्या आत किंवा रुळांवर कचरा टाकतात, ज्यामुळे ते दोन्ही अस्वच्छ होतात. आपल्या सर्वांचे एक पाऊल ट्रेनचा प्रवास नीटनेटका आणि स्वच्छ करू शकते; असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट @trainwalebhaiya या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच ही पोस्ट पाहून एका युजरने, बाटली चेपून किंवा चिरडून मगच कचराकुंडीत फेकून द्या. जरी तुम्ही बाटली चेपून किंवा चिरडून टाकण्याचे विसरलात तरीही त्याचे झाकण आठवणीने काढून फेकून द्या. कारण, बाटली अशीच फेकली तर तिचा पुन्हा उपयोग करण्यात येतो. मी नेहमी वरील गोष्टी करतो, असे युजरने कमेंटमध्ये सांगितले आहे. यापुढे ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवू, असा रिप्लायसुद्धा युजरने या कमेंटला दिला आहे.