तुमच्यापैकी काही जण सुट्यांच्या निमित्ताने किंवा काही कामानिमित्त मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून प्रवास करीत असतील. प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुखकर होण्यासाठी आतापर्यंत या एक्स्प्रेसवेवर अनेक मोठे बदल करण्यात आले. त्यामध्ये रस्त्यांचे रुंदीकरण असो वा मग वेगावर नियंत्रणासाठीची गोष्ट आदी गोष्टींचा समावेश होतो. पण, त्यानंतरही या एक्स्प्रेसवेवरील अपघातांचे आणि वेगाने वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण काही रोखता येत नव्हते. अशा स्थितीत रस्ते वाहतूक विभागाने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अशी काही गोष्ट केली आहे की, ज्याने तुमच्या खिशाला कात्री लागू शकते. त्यामुळे या एक्स्प्रेसवेवरून प्रवास करण्याआधी बातमीतील video पाहा मगच घराबाहेर पडा.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक गृहस्थ कारने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून प्रवास करतोय. यावेळी तो, “एक्स्प्रेसवेवर आता १०० ची वेगमर्यादा ओलांडल्यास थेट दोन हजार रुपयांचा ऑनलाइन दंड आकारण्यात येत आहे. त्यासाठी या मार्गावर प्रत्येक दोन किमी अंतरावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेl. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वेगाने जाणाऱ्या वाहनांनावर आता नजर ठेवली जाईल, असे सांगत तो चालकांना ठरवून दिलेल्या वेगमर्यादेतच वाहन चालवा आणि दंडापासून दूर राहा”, असे आवाहन करतोय.
दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून दररोज हजारो वाहने प्रवास करतात. त्यात कार, बस आणि अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. पण, काही वाहनचालक वेगमर्यादा न पाळता, सुसाटपणे वाहन चालवितात. मार्गावर काही ठिकाणी १०० किमीपेक्षा कमी वेगमर्यादा ठेवणे बंधनकारक आहे. पण, तरीही नियमांना डावलून चालक वाहन चालवतात. त्यामुळे अनेकदा भीषण अपघाताच्या घटना घडतात.
आता अशा बेजबाबदार वाहनचालकांवर करडी नजर ठेवण्यासाठी महामार्गावर एक्स्प्रेसवेवर प्रत्येक दोन किमी अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यानुसार १०० किमीपेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या वाहनांची नंबर प्लेट स्कॅन करून, संबंधितांना थेट चलन पाठविण्यात येणार आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास चालकांना दोन हजार रुपयांचा दंड होणार आहे. त्यामुळे तुम्हीदेखील मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून प्रवास करणार असाल, तर वाहनाच्या वेगमर्यादेची काळजी घ्या.