मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्राण्यांबरोबर काही लोकांनी केलेल्या क्रूर कृत्यांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे प्राण्यांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण होऊ लागली आहे. नुकतेच एका व्यक्तीने ट्रॅक्टरची सीट खराब केली म्हणून एका कुत्र्याचा जीव घेतला होता अशातच आता उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्राणीप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तीन लोक माकडावर अत्याचार करताना दिसत आहेत.
फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, नितीन कुमार नावाच्या व्यक्तीने सिकंदराबाद रोडवर असलेल्या एका कारखान्यात माकडांबरोबर केलेल्या अत्याचाराबाबतची तक्रार पोलिसांत दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. नितीनने पोलिसांना सांगितले की, त्याने स्वत:च्या डोळ्यांनी अकील नावाच्या व्यक्तीला त्याचे मित्र नसीर आणि फैजल यांच्याबरोबर हे क्रूर कृत्य करताना पाहिले. हे तिन्ही आरोपी माकडाच्या गळ्यात दोरी बांधून त्याला कारखान्याबाहेर ओढत होते असंही त्याने सांगितलं.
या संतापजनक घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, जो पाहून अनेक नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. शिवाय या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचीही मागणी देखील नेटकरी करत आहेत. शिवाय हा व्हिडीओ इतका घृणास्पद आहे की तो अनेक सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवरुन डिलीट करण्यात आला आहे. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती माकडाच्या गळ्यात दोरी बांधून त्याला ओढत असल्याचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला –
धक्कादायक बाब म्हणजे या तिन्ही आरोपींनी माकडावर अत्याचार तर केलेच पण या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट करुन तो सोशल मीडियावर शेअर देखील केला. हा व्हिडिओ अकीलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता, जो व्हायरल झाल्यानंतर आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तिघांविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.