सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनेक लोकांनी मिळून अॅपल स्टोअर लुटल्याचं पाहायला मिळत आहे.. धक्कादायक बाब म्हणजे शहराच्या मध्यभागी असलेल्या वॉलनट स्ट्रीटवर ही घटना घडली आहे. यावेळी लोकांनी फूट लॉकर आणि अॅपल स्टोअरला लक्ष्य केलं आणि या दुकानातील महागड्या वस्तू पळवल्या. या घटनेमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण होताच पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी काही लोकांना पकडल्याचंही व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.
फिलाडेल्फियातील अॅपल स्टोअर लोकांनी लुटल्यानंतर पोलिसांनी सुमारे वीस जणांना अटक केली आहे. शिवाय या लुटमारीचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या महिलेलाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १०० जणांच्या टोळक्याने या परिसरातील दुकाने लुटली. अनेक तरुणांनी तोंड दिसू नये म्हणून मास्क देखील घातले होते. व्हिडिओमध्ये, हे टोळकं अॅपल स्टोअरमध्ये घुसल्याचं दिसत आहे. ले लोकं स्टोअरमधील महागडे आयफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन पळत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी दुकानात घुसलेल्या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे मोठी चेंगराचेंगरी झाली.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
@pawanyadav8 नावाच्या युजरने लिहिलं, “याला म्हणतात कायदा आणि सुव्यवस्था ढासळणे आणि समाजाची विकृती कारण जेव्हा इतके लोक दुकान लुटत असतात तेव्हा ती चोराने केलेली चोरी नव्हे तर समाजातील लोकांनी केलेली लूट असते.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “बिचाऱ्यांनी काय करावे? इतका वेळ रांगेत उभे राहूनही त्यांना फोन मिळत नव्हता, म्हणून आता त्याने हा मार्ग निवडला.” या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं, “आंदोलक एकत्र जमले होते. शिवाय अशी घटना घडण्याची शक्यता असल्याचे त्यांना माहीत होते त्यामुळे घटनेची माहिती मिळताच लगेच या ठिकाणी फौजफाटा पाठवण्यात आला होता.” शिवाय आता हे आंदोलक नव्हते, तर गुन्हेगार होते, असं बोललं जात आहे.