Funeral Accident : मृत्यू कोणालाही टळलेला नाही. तो आज ना उद्या येणारच. कोणाचाही अचानक मृत्यू झाला, तर दु:ख होते अन् वाईट तर वाटतेच; पण त्या दु:खातून सावरत आपण त्या व्यक्तीला शांती लाभावी अशी प्रार्थना करतो आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार केले जातात. अशा प्रकारे स्मशानभूमीत एका मृतदेहावर दफन विधी करण्याची तयारी सुरू होती. त्यावेळी अशी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली, जी पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दफनभूमीत मृतदेहावर दफन विधी सुरू होता. त्यावेळी खोलवर जमिनीत खड्डा खणून शवपेटी व्यवस्थित ठेवली जात होती. या कामामध्ये चार जण गुंतले होते. त्यात काही लोक खणलेल्या खड्ड्याच्या मातीच्या ढिगाऱ्यावर उभे राहून शवपेटीजवळील बाजू प्लास्टिकच्या कागदाने झाकण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, याचदरम्यान मातीचा ढिगारा कोसळला आणि खड्ड्यात उभे असलेले लोक गाडले गेले आणि ढिगाऱ्यावरील लोकही त्यात पुरले गेले. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेले लोकच दफनभूमीत दफन केले गेले. व्हिडीओतील हे दृश्य पाहून तुमचाही थरकाप उडेल.
हा व्हिडीओ @crazyclipsonly नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर अनेकांनी गाडले गेलेले ते चार लोक जिवंत आहेत का, असा प्रश्न विचारला आहे. तर कोणी म्हणतेय, या प्रथा नेहमीच लोकांसाठी त्रासदायक ठरल्या आहेत.” त्याचप्रमाणे आणखी एका युजरने लिहिले, “हे भयानक दृश्य आहे”, तसेच काहींनी, एवढा भयानक दफनविधी मी कधीच पाहिला नाही”, असे म्हटले आहे.