स्विगी इन्स्टामार्टवर २०२२ मध्ये सर्वात जास्त शोध घेतलेल्या वस्तूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. स्विगी इन्स्टामार्टने याबाबत ट्विट करून तपशील सादर केला आहे. लोकांनी शोधलेल्या गोष्टींची नावं वाचून नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे. विशेष म्हणजे स्विगी इन्स्टामार्टसारख्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर आईलाही शोधण्याचा भन्नाट प्रकार काही जणांनी केला आहे. किराणा दुकानात जाऊन घरगुती सामान खरेदी करण्यातकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. कारण दिवसेंदिवस ऑनलाईन शॉपिंग करण्याचा कल वाढत चालला आहे. घरपोच सामान मिळत असल्याने स्विगी इन्स्टामार्टवर वस्तूंचा शोध घेण्यात अनेक जण व्यग्र झाले आहेत. पण २०२२ मध्ये स्विगी इन्स्टामार्टवर शोधलेल्या भन्नाट गोष्टींची यादी जाहीर झाल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
स्विगी इन्स्टामार्टने शेअर केलेल्या यादीत पहिल्या नंबरवर बेड आहे. लोकांनी २३४०० हून अधिक वेळा स्विगी इन्स्टामार्टवर बेड शोधला आहे. सोफा दुसऱ्या स्थानावर आहे. २० हजारांहून अधिक लोकांनी स्विगी इन्स्टामार्टवर सोफा शोधला आहे. त्यानंतर अंडरवियर, पेट्रोल आणि मॉमी शोधण्याचा प्रयत्न लोकांनी केला आहे. लोकांनी शोधलेल्या काही गोष्टी या स्टोरच्या माध्यमातून दिल्या जात नाहीत, हे वास्तव आहे. डिलीव्हरी अॅपने या सर्व गोष्टींची यादी ट्विटरवर शेअर केली आहे. ही यादी पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, ” कुणीही प्रेमाचा शोध घेतला नाही, असं तुम्ही म्हणताय?”. दुसरा नेटकरी म्हणाला, ज्यांनी पेट्रोल शोधलं आहे, कदाचित त्यांची गाडी रस्त्यावर बंद पडली असेल, तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे.” तिसरा नेटकरी म्हणाला, ” मी : बेडची ऑर्डर केली, नोटिफिकेशन : तुमच्या डिल्हवरी एजंटने तुमची ऑर्डर स्विकारली आहे, मी कस्टमर सपोर्टशी बोलताना: तुमच्या डिलीव्हरी एजंटला सांगा ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करायला.” अशाप्रकारे नेटकऱ्यांनी या पोस्टवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.