Drone Desi Jugaad For Zomato Food Delivery : घरच्या घरी स्वादिष्ट पदार्थांवर ताव मारण्यासाठी काही माणसं ऑनलाईन फूड ऑर्डर करतात. संपूर्ण देशभरात झोमॅटो फूड डिलिव्हरीचं जाळं पसरलं आहे. लाल रंगाच्या टी शर्ट मध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून प्रवास करत ग्राहकांच्या दारी पोहचतात. पण दिवसभर प्रवास करणाऱ्या झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांना कधीतरी कंटाळा येतच असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयने दूरच्या प्रवासाला कंटाळून फूड डिलिव्हरीसाठी चक्क ड्रोनच बनवला आहे. सोहन राय असं या तरुणाचं नाव आहे. सोहमने ड्रोनचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यूजर्स भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.
सोहम राय जेव्हा झोमॅटो डिलिव्हरी एजंट बनला, त्यानंतर त्याला सततच्या कामाचा आणि प्रवासात ट्रॅफिकमध्ये अडकून राहण्याचा वैताग आला होता. त्यानंतर सोहमने फास्टर फूड डिलिव्हरी करण्यासाठी एक ड्रोन बनवण्याचा निर्णय घेतला. सोहम कशाप्रकारे ड्रोन बनवत आहे आणि फूड डिलिव्हरीसाठी ड्रोनचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे त्याने व्हिडीओच्या माध्यमातून दाखवलं आहे. जेव्हा ड्रोन पूर्णपणे तयार होतो, त्यानंतर तो पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी त्या ड्रोनचा वापर करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
इथे पाहा ड्रोनचा भन्नाट व्हिडीओ
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सोहमने म्हटलंय, ड्रोन डिलिव्हरी…दिर्घकाळापासून आपण या गोष्टीबद्दल ऐकत आलो आहोत. पण भारतात याचा वापर काही गोष्टींसाठी केला जात नसल्याचं चित्र आहे. ड्रोन बनवण्याची प्रचंड उत्सुकता होती, त्यामुळे मी माझं कौशल्य पणाला लावलं आणि एक ऑटोनोमस ड्रोन बनवला. ज्यामुळे मला लोकांच्या घरी पिझ्झा डिलिव्हरी करताना मदत होते. देशी जुगाड करून मी हा ड्रोन बनवला. हा एक प्रयोग आहे आणि यासाठी मी सुरक्षिततेच्या सर्व गोष्टींचं पालन करत आहेत.