Money throwing Video Viral: लाच देणं किंवा घेणं, हा कायद्यानं गुन्हा असला तरी काही भ्रष्ट अधिकारी पैसे मिळाल्याशिवाय हालचाल करत नाहीत. याचा फटका सामान्यांना बसतो. मग सामान्य लोक आंदोलनाचे हत्यार उपसतात. गुजरातमध्येही सामान्य लोकांनी आपल्या कामासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र त्यांनी केलेली कृती आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एक व्हिडीओ सध्या एक्सवर शेअर होत आहे. ज्यामध्ये सरकारी अधिकाऱ्याच्या अंगावर सामान्य लोक नोटा उधळताना दिसत आहेत. “हे घे, खायचेत तेवढे पैसे खा”, अशा घोषणा देतानाही लोक दिसत आहेत. अधिकारी काम करत नसल्याच्या रागातून ही कृती केल्याचं बोललं जात आहे.
व्हिडीओमध्ये काय दिसते?
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक अधिकारी आपल्या टेबलावर बसलेला दिसत आहे. त्याच्यासमोर काही लोक हातात निषेधाचे फलक घेऊन उभे असून घोषणाबाजी करत आहेत. तर काही लोक हातातील पिशव्यामधून आणलेले पैसे अधिकाऱ्याच्या अंगावर उधळत आहेत. हा व्हिडीओ गुजरातचा असल्याचे सांगितले जाते. लोक गुजरातीमधून घोषणाही देत आहेत. मात्र व्हायरल होणारा व्हिडीओ नेमका कधीचा आहे? हे कळू शकलेले नाही.
एक्सवर एका युजरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यानं लिहिलं की, भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. अधिकाऱ्यांना नोकरी मिळविण्यासाठी लाच द्यावी लागते. वरच्या अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात. व्हायरल होणारा व्हिडीओ गुजरातचा आहे.
सदर व्हिडीओमध्ये लोक अस्वच्छ पाणी येत असल्याची तक्रार करत आहेत. एकजण बोलत आहे की, आमच्या घरी अस्वच्छ पाणी येत आहे. तर दुसरा एक व्यक्ती म्हणतो की, बिस्मिल्ला सोसायटीतही घाणेरडं पाणी येत आहे. आणखी एक व्यक्ती म्हणतो, “तुम्हाला किती पैसे हवेत? हे घ्या आणि खा..”. तसेच इतर लोकही आपल्या पिशव्यातील नोटा अधिकाऱ्याच्या अंगावर उधळताना दिसतात.
हा संपूर्ण घटनाक्रम सुरू असताना अधिकारी मात्र शांतपणे बसलेला दिसत आहे. आंदोलकांसमोर तो हात जोडतो, मात्र आंदोलकांचा रोष काही थांबत नाही. हा व्हिडीओ गुजरातमधील नेमक्या कोणत्या शहरातला आणि सरकारी विभागतला आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.