जगभरामध्ये कित्येक असे लोक आहेत जे मटण खातात. विविध देशांमध्ये जनावरांचे मांस खाण्याची पद्धत आहे. कित्येक लोकांना चिकन खायला आवडते आहे आणि कित्येक लोकांना मटण खायला आवडते. काही लोक बोकडाचे मटण खातात. पण खूप कमी देशांमध्ये मांजरांचे मांस खाल्ले जाते. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये मटण आणि पोर्क (Pork) च्या नावाखाली मांजराचे मांस विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मांजरांबाबत असा भयानक प्रकार होत असल्याचे समजल्यानंतर संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. हे प्रकरण झांगजियागँग (Zhangjiagang, China) नावाच्या शहरात घडले आहे. पोलिसांनी १००० पेक्षा जास्त मांजरांची सुटका करून त्यांचा जीव वाचवला आहे. या मांजरांना कत्तलीसाठी कत्तलखान्यात घेऊन जात होते.
चीनमध्ये होते मांजरांची कत्तल
मांजराचे मांस स्वस्तात विकले जात असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. अर्धा किलो मांसाची किंमत ३०० ते ३५० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मांजरांची कत्तल होण्यापासून वाचवण्यात यश आले आहे. सुटका करण्यात आलेल्या मांजरांना निवारागृहात (Shelter home) ठेवण्यात आले आहे. चीनमधील अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याचा विरोध केला जात आहे.
झांगजियागँगमधील सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आले की, परिसरातून मांजर गायब होत आहेत. या मांजरांना लाकडी पेटीत बंद करून कुठेतरी घेऊन जात होते. मात्र, पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत मांजरांचे प्राण वाचवण्यात यश आले. मांजरांना मारून मांस विकण्याची योजना यशस्वी झाली असती तर आरोपींना १७ लाखांहून अधिक रक्कम मिळू शकली असती. पण हा प्रयत्न पोलिसांच्या प्रयत्नांमुळे अयशस्वी ठरला.