जन्माला आलात तर मरणही निश्चित आहे, हा नियम आहे. मृत्यूचा काही नेम नाही, अशा आशयाची एक म्हण आहे. माणसाला कधी, कुठे व कसं चालता-बोलता मरण येईल ते सांगता येत नाही. त्यामुळे असं म्हणण्यात येतं. याचीच प्रचिती आली आहे एका नुकत्याच समोर आलेल्या घटनेवरून. आता सोशल मीडियावर ही घटना व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊ….
तेलंगणाच्या राजधानीत एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला; तर एक जण जखमी झाला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. रस्त्यावरून वाहने जात असताना अचानक झाड लोकांवर कोसळल्याने हा अपघात झाला. झाड एवढ्या वेगाने कोसळले की, घटनास्थळी उपस्थित लोकांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. आता या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोसट्याच्या वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आणि हैदराबादमधील शालीबांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काला पत्थर रोडवर ही घटना घडली; ज्यात झाड पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मोहम्मद (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे; तर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव अहमद (वय ४३) आहे. झाडाखाली दबल्याने अहमद यांना अनेक गंभीर दुखापती झाल्या. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी वेळ न दवडता, झाडाखाली गाडलेल्या अहमदला बाहेर काढले. त्यांनी मोहम्मदलाही बाहेर काढले होते; परंतु गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
(हे ही वाचा : बॉयफ्रेंडबरोबर फोनवर बोलता बोलता रुळावर आली तरुणी; अचानक ट्रेन समोर पाहताच घेतला असा निर्णय की, Video व्हायरल )
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एखादे झाड लोकांवर कशा रीतीने जोरात कोसळते ते तुम्ही पाहू शकता. व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला एक रिक्षा उभी असल्याचे दिसत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांचे दृश्य अगदी तसंच होतं, जे सहसा रस्त्यावर दिसतं. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल, असे काही घडते. अचानक एक प्रचंड मोठे झाड जोरात कोसळते. झाड पडताच अनेक लोक त्याखाली गाडले गेले. रस्त्याच्या कडेला उभी केलेली रिक्षा झाडाखाली दबल्याने मोठे नुकसान झाले. घटनास्थळी चेंगराचेंगरी होते. या अपघातात मोहम्मद नावाच्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे हे झाड कोसळलं. जमीन भुसभुशीत झाल्यामुळे झाडाचं ओझं न पेलवल्यामुळे हे झाड कोसळून पडलं अन् मोठी हानी झाली.