आजकाल सोशल मीडियावर अनेक असे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जे पाहून कोणाला कधी मरण येईल हे सांगता येत नाही, या वाक्यावर अनेकांटा विश्वास बसत आहे. हो कारण मागील काही काळापासून हृदयविकाराच्या झटक्याने नागरिकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. कधी जिममध्ये व्यायाम करायला गेल्यावर, तर कधी मंदिरात देवाच्या पाया पडताना अचानक जमिनीवर कोसळून अनेकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. सध्या अशाच एका व्यक्तीचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर तरुणांपासून ते वयस्कर लोकांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच डीजेच्या आवाजामुळे एका नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशातच एक व्यक्ती घरातून ऑफिसला आवरुन जात असताना अचानक खाली कोसळतो आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अचानक बिघडली तब्येत –
व्हायरल होत असलेला व्हिडिओ @ajaychauhan41 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती घरातून तयार होऊन ऑफिसला निघाल्याचं दिसत आहे. त्याच्या एका हातात बॅगही दिसत आहे. त्यानंतर तो लिफ्टजवळ जातो, बटण दाबतो आणि लिफ्टची वाट पाहत असतो याच दरम्यान त्याची तब्येत बिघडू लागते.
व्हिडीओ पाहून अनेकांना बसला धक्का –
व्हायरल व्हिडिओमधील माणूस आपली बॅग जमिनीवर ठेवतो आणि काही वेळ बाहेरची हवा घेण्यासाठी इमारतीच्या खिडकीतून बाहेर डोकावतो. त्याचवेळी त्याला चक्कर येते आणि खाली पडून त्याचा मृत्यू होतो. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तर या व्यक्तीचा असा अचानक मृत्यूचा व्हिडीओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.