Man Sexually Assault Dogs: अत्याचारांच्या घटनेमध्ये दुर्दैवाने अनेकदा पीडितांवर उलट आरोप केला जातो. पण जेव्हा मुक्या प्राण्यांवर अत्याचार केले जातात तेव्हा दोष द्यायचा तरी कुणाला? अशाच एका विकृतीचा अत्यंत धक्कादायक व्हिडीओ ऑनलाईन व्हायरल होत आहे. गुरुग्राममध्ये शूट केलेल्या या क्लिपमध्ये ही व्यक्ती श्वानांच्या प्रायव्हेट पार्टसना खुलेआम हात लावताना दिसत आहे. स्ट्रीट ॲनिमल्स ऑफ मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये धक्कादायक कृत्य कैद झाले होते. ही घटना इतकी गंभीर आहे की व्हिडीओ सेन्सॉर करूनच या पेजवर शेअर करण्यात आला होता पण ऑनलाईन काही युजर्सनी टीका करण्यासाठी व्हिडीओ शेअर करताना हे भान राखलेले नाही. व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती वयाने वृद्ध दिसतेय, भररस्त्यात रात्रीच्या वेळी हा इसम रस्त्यावरील भटक्या श्वानांच्या प्रायव्हेट भागाला हात लावून त्यांना आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसतेय.

अनेक महिन्यांपासून श्वानांवर अत्याचार

प्राप्त माहितीनुसार, सदर व्हिडीओ हा गुरुग्रामच्या सेक्टर ४८ मध्ये शूट करण्यात आला होता. असे गलिच्छ कृत्य करण्याची ही या व्यक्तीची पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी सुद्धा त्याला काहींनी असा अत्याचार करताना पाहिले होते यावेळेस पुरावा म्हणून त्यांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि हा प्रकार उघडकीस आला. इंस्टाग्राम पेजवर दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती मागील कित्येक महिने सतत या श्वानांवर अत्याचार करत होती. व्हिडीओच्या सुरुवातीला हा विकृत रस्त्यावरील श्वानांना पाठीवर झोपायला लावतो आणि मग त्यांच्या पोटावरून व प्रायव्हेट भागावरून हात फिरवतो यामुळे श्वान सुद्धा उठून उभं राहायचा प्रयत्न करतात पण हा माणूस त्यांना दुसऱ्या हाताने खाली झोपून राहायला लावतो.

दुसऱ्या क्लिपमध्ये हाच माणूस स्वतःच्या घराबाहेर बसलेला दिसतो जिथे तो आपल्या हातांनी श्वानांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसतो तर अन्य एका क्लिपमध्ये या माणसाने खाली वाकून श्वानांच्या प्रायव्हेट भागाला आपल्याला हाताने दाबण्याचा प्रयत्न केल्याचे सुद्धा दिसून आले होते.

पोलीसही दखल घेईना!

इन्स्टाग्राम पेजने हा व्हिडीओ शेअर करताना या व्यक्तीवर कारवाई व्हावी अशी मागणी केली असली तरी अद्याप पोलिसांनी याची दखल घेतल्याचे वृत्त समोर आलेले नाही. पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे, त्याच भागात राहणाऱ्या एका लहान मुलीने सर्वात आधी हा प्रकार पाहिला होता, तिने अनेकदा या व्यक्तीला थांबवण्याचाही प्रयत्न केला पण त्या व्यक्तीने तिचं अजिबात ऐकलं नाही. पोलिसांनी सुद्धा याकडे लक्ष दिलेलं नाही.

दरम्यान, अगदी २४ तासांपूर्वीच असंच एक प्रकरण जागतिक स्तरावर सुद्धा चर्चेत आलं होतं. प्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ ॲडम ब्रिटन यांना प्राणी अत्याचाराच्या ६० गुन्ह्यांची शिक्षा म्हणून न्यायालयाने २४९ वर्षांची शिक्षा सुनावल्याचे वृत्त युके मिररने दिले होते. जगप्रसिद्ध प्राणिशास्त्रज्ञ ब्रिटन यांनी ४२ श्वानांचा छळ करून त्यापैकी ४९ श्वानांचा खून केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या किळसवाण्या कृत्याचे त्यांनी व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले होते. श्वानांवर बलात्कार, छळ आणि खूनाचा आरोप ब्रिटन यांच्यावर दाखल झाला असून ऑस्ट्रेलियात त्यांना २४९ वर्षांची शिक्षा झाली आहे.