माणसांपेक्षा जास्त प्रामाणिकपणा प्राण्यांमध्ये असतो. कुत्रा हा प्राणी त्याच्या प्रामाणिकपणासाठी ओळखला जातो. एकदा त्याने एखाद्यावर जीव लावला की त्याची साथ ते आयुष्यभर सोडत नाही. मालकाच्या मृत्यूनंतरही त्याची साथ न सोडणाऱ्या कुत्र्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कुत्र्याचा प्रामाणिकपणा दर्शवणारी घटना समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये दोन ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिमाचलच्या बीर बिलिंगमध्ये चालत असताना घसरून दोन ट्रेकर्सला आपला जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्यासोबत आलेल्या त्याच्या पाळीव कुत्र्याने तब्बल ४८ तास दोन्ही मृतदेहांचे संरक्षण केले.
एनडीटीव्हीनुसार, त्याचा जर्मन शेफर्ड कुत्रा दोन्ही ट्रेकर्ससह ट्रेकवर गेला होता. बचाव पथकाला दोन दिवसांनंतर ट्रॅकर्सचे मृतदेह सापडले. त्यांचा पाळीव कुत्रा तब्बल ४८ तास मृतदेहाजवळ बसून भुंकत राहिला. तो त्याच्या मालकाच्या मृतदेहाला सोडून कुठेही गेला नाही.
हेही वाचा – सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ! शाकाहारी थाळी झाली महाग अन् मांसाहारी थाळीचे दर…
अभिनंदन गुप्ता (३०, रा. पठाणकोट, पंजाब) आणि प्रणिता वाला (२६ रा. पुणे) अशी मृत ट्रेकर्सची नावे आहेत. ट्रेकिंगदरम्यान पाय घसरून पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे समजते. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनंदन गुप्ता आणि प्रणिता बराच वेळ परतले नाहीत तेव्हा ग्रुपमधील इतर लोकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. काही वेळातच त्याच्या शोधासाठी शोध पथक पाठवण्यात आले. मंगळवारी सकाळी पोलिस अधिकाऱ्यांसह बचाव पथकाने शोध मोहीम सुरू केली. जर्मन शेफर्डचा सतत भुंकण्याचा आवाज ऐकून एक टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा काही तासांनंतर त्यांचे मृतदेह सापडले.
हेही वाचा – चिमुकल्या कबड्डी खेळाडूने केली कमाल! झेप घेत खेळाडूला केले चितपट, व्हिडीओ होतोय व्हायरल
४ जणांचा ग्रुप होता
हिमाचलमध्ये सुमारे ५००० फूट उंचीवर असलेले बीर बिलिंग हे ट्रॅक आणि पॅराग्लायडिंगसाठी आवडते ठिकाण आहे. एबीपी न्युजच्या वृत्तानुसार, कांगडा जिल्ह्याचे पोलिस प्रमुख वीर बहादूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनंदन गुप्ता गेल्या चार वर्षांपासून पॅराग्लायडिंग आणि ट्रेकिंगसाठी या भागात राहत होता. प्रणिता काही दिवसांपूर्वीच पुण्याहून आली होती. एका कारमधून ४ जणांचा ग्रुप निघाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हवामानातील बदलानंतर गाडी पुढे जाऊ शकली नाही आणि दोन जण परतले, तर गुप्ता आणि प्रणिता आपल्या कुत्र्याला घेऊन पायी निघाले.