गोड पदार्थ म्हणजे अनेक लोकांचा जीव की प्राण आहे. लोक काहीही विचार न करता अगदी आवडीने विविध गोड पदार्थ खातात. यामुळे आपल्या मिठाईच्या दुकानांमध्येही गोड मिठाईचे विविध प्रकार पाहायला मिळतात. याच मिठाईतील एक प्रकार म्हणजे आग्र्याचा पेठा. हा गोड पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहे, पण असं असलं तरीदेखील हा पदार्थ किती हायजेनिक असतो किंवा साफ आणि स्वच्छ ठिकाण बनवला जातो हे तुम्ही कधी पाहिले आहे का? नसेल तर पेठा बनवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो एकदा जरूर पाहा. कारण तो पाहिल्यानंतर पुढच्यावेळी कधी पुन्हा आवडीने पेठा खाण्याची हिंमत करणार नाहीत. कारण ज्या कढईत पेठा बनवण्यासाठी वापरला जाणारा कोहळा (पांढरा भोपळा) धुतला जात आहे, त्याच कढईत कारागीर हात आणि तोंड धुवत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
व्हिडीओमध्ये पेठा बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. पण, यावेळी अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. पेठा बनवण्यासाठी वापरला जाणारा कोहळा ज्या पातेल्यात धुतला जातो त्याच पातेल्यात कारागीर हात धुतोय. इतकंच नाही तर ज्या पातेल्यात पेठा ठेवला आहे त्याच पातेल्यात दुसरा कारागीरही तोंड धुतो आहे.
पेठा बनवण्याची गलिच्छ पद्धत दाखवणारा हा व्हिडीओ yyummymania नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे, तर अनेकांनी कमेंटस करून पेठा बनवण्याची पद्धत अत्यंत गलिच्छ असल्याचा संताप व्यक्त केला आहे.
यावर एका युजरने लिहिले, ‘कदाचित हे आग्र्याचे फेस वॉश असावे.’ तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘मी हे पेठा बनवण्यासाठी वापरे जाणारी फळभाजी कशी धुतात, हे पाहण्यासाठी थांबलो होतो, पण हे लोक त्यातच स्वत:ला धुवू लागले…’ यावर तिसऱ्या एकाने लिहिलेय की, पेठ्याला एक नैसर्गिक चव दिली जात आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक खाद्यपदार्थ बनवणारे विक्रेते त्यांच्या पदार्थ बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान स्वच्छतेकडे लक्ष देत नसल्याबद्दल संताप व्यक्त करत आहेत, तर काहींचे म्हणणे आहे की, अशी परिस्थिती सर्वत्र घडत नाही. आपण जसे पैसे खर्च करतो तशीच वस्तू आपल्याला मिळते. तर काहींनी या व्हिडीओनंतर FSSAI अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन खाद्यपदार्थ बनवण्याच्या पद्धतीत निष्काळजीपणा आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.