लग्न समारंभात सोने-चांदी आणि महागड्या भेटवस्तू दिल्या जात असल्याबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. पण तामिळनाडूतील एका लग्नात वराच्या काही मित्रांनी अशी भेटवस्तू दिली की सगळे बघतच राहिले. कारण सध्या देशात संसदेपासून सामन्य लोकांपर्यंत या वस्तूची चर्चा आहे. ही वस्तू दुसरी तिसरी काय नसून पेट्रोल-डिझेल आहे. हे लग्न तामिळनाडूतील चेयुर येथे पार पडलं. मात्र या लग्नातील अनोख्या भेटवस्तूची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
मित्रांकडून वर ग्रेस कुमार आणि वधू कीर्तना यांना लग्नाची भेट म्हणून एक लिटर पेट्रोल आणि एक लिटर डिझेल मिळाले. हे भेटवस्तू पाहून सुरुवातीला हे नवविवाहित जोडपे आश्चर्यचकित झाले. नंतर त्याने मित्रांची ही भेट आनंदाने स्वीकारली आणि फोटोसाठी पोजही दिली. या अनोख्या भेटीनंतर लग्नमंडपात एकच हशा पिकला. नवीन जोडप्याने मित्रांकडून ही भेट स्वीकारली आणि त्यांच्याकडे ठेवली. मित्रांनी सांगितले की, डिझेल आणि पेट्रोलचे दर ज्या प्रकारे वाढत आहेत, ते सोन्या-चांदीसारखे होत आहे. त्यामुळे लग्नात मित्राला डिझेल-पेट्रोल गिफ्ट करायचं ठरवलं.
२०१८ मध्ये तमिळनाडूतच असाच प्रकार घडला होता. कुड्डालोरमध्ये एका लग्न समारंभात वराच्या मित्रांनी त्याला पाच लिटर पेट्रोलने भरलेला कॅन भेट दिला होता. तेव्हा तामिळनाडूमध्ये प्रति लिटर पेट्रोल ८५.१५ रुपये होते. देशात २२ मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज वाढत आहेत. गेल्या १७ दिवसांत देशभरात पेट्रोल १० रुपयांनी महाग झाले आहे. सरकार ८० ते ८० पैसे कर लावून दरात जवळपास दररोज वाढ करत आहे. त्याचा परिणाम सामान्य जनतेवर होत आहे.