चेन्नईतील एका मेडिकल दुकानामध्ये १५ हजार रुपये मासिक पगारावर काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या खात्यात अचानक ७५३ कोटी रुपये जमा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्या खात्यात जमा झालेला बक्कळ पैसा पाहून तो ही चक्रावून गेला. काय झालं नेमकं, जाणून घेऊया…
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, करणकोविल येथील रहिवासी असलेले मुहम्मद इद्रिस हे तेनामापेठ येथील एका मेडिकल दुकानात काम करतात. ७ ऑक्टोबर रोजी त्यांनी त्यांच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यातून आपल्या मित्राला २,००० रुपये पाठवले होते. यानंतर इद्रिस यांनी बँक बँलेन्स तपासण्यासाठी एसएमएस पाहिला असता, त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. कारण, मेसेजद्वारे त्यांना कळले की, त्यांचा बँक बॅलन्स ७५३ कोटींवर पोहोचला आहे. व्यक्तीला त्याच्या फोनवर आलेला एसएमएस पाहून आश्चर्यच वाटले. तो चक्क करोडपती झाला.
(हे ही वाचा : जुगाडमधून महिलेने बनवला ढासू ड्रम सेट; तिचा परफॉर्मन्स Video पाहून युजर्स म्हणाले, “भारी टॅलेंट…”)
इद्रिसने लगेच बँकेला कळवले. बँकेकडून त्याचे अकाउंट सीज करण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे चुकीची रक्कम जमा झाल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी सीज केले. इद्रिसने सांगितले की, खात्यात इतकी मोठी रक्कम जमा झाल्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.
तर दुसरीकडे कोटक महिंद्रा बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले की, एसएमएस मेसेजिंगमधील त्रुटीमुळे ही घटना घडली. इद्रिस यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा एसएमएस दिसत आहे. पण खरंतर, त्यांच्या खात्यात प्रत्यक्षात रक्कम जमा झालीच नाही. तसेच टीम यावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.