अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. मागील काही दिवसांपासून अयोध्येत या कार्यक्रमाची लगबग सुरू होती. पायाभरणीचा कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. करोनाच्या पार्श्वभूमीवर अगदीच मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. मात्र या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने देशभरातील रामभक्तांना हा सोहळा वेगवेगळ्या माध्यमातून पाहता आला. मात्र या सर्वांमध्ये एका खास व्यक्तीचाही समावेश होता. या व्यक्तीचा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या व्यक्तीचे नाव आहे के. पारासरन.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक दशकं चाललेल्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद खटल्यात वरिष्ठ वकील पारासरन यांनी हिंदू पक्षाची बाजू मांडली. जवळजवळ ४० वर्ष त्यांनी न्यायालयासमोर हिंदू पक्षाची बाजू मांडली. पारासरन हे दक्षिण भारतीय कुटुंबातील आहेत. पारासरन यांचा पारंपारिक दक्षिण भारतीय पोषाखातील फोटो आज राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या दिवशी व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये पारासरन हे आपल्या कुटुंबियांसोबत टिव्हीवर भूमिपूजन सोहळा पाहत असल्याचे दिसत आहे. गुजरात भाजपाचे सचिव प्रदिपसिंह वाघेला यांनी ट्विटवरुन हा फोटो पोस्ट केला आहे. हे अतिशय सुंदर दृष्य आहे असं वाघेला यांनी म्हटलं आहे. “के. पारासरन हे आज सर्वात आनंदी व्यक्ती असतील. ९२ वर्षांच्या पारासरन यांनी वकील म्हणून रामलल्लाची बाजू न्यायालयात मांडली,” असं वाघेला यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. यानंतर ट्विटवर ‘K. Parasaran’ हा टॉपीक ट्रेण्ड होतानाही दिसत आहे.

९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयानं राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. अनेक दशकांपासून रखडलेल्या या वादावर तोडगा काढत न्यायालयानं केंद्र सरकारला कार्यवाही करण्याचे आदेश दिले. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावे, तर मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्यात येईल, असा निर्णय घटनापीठानं एकमतानं दिला. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासहीत न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं हा निकाल दिला. अनेक दशकं चाललेल्या या खटल्यात वरिष्ठ वकील के. पारासरन यांनी फार महत्वाची भूमिका बजावली. ९२ वर्षांच्या पारासरन यांनी या खटल्यात हिंदू पक्षाची बाजू मांडली. विशेष म्हणजे मागील चाळीस वर्षांपासून ते या खटल्यामध्ये हिंदूंची बाजू मांडत होते.

नक्की पाहा >> अयोध्या प्रकरणामुळे सतत चर्चेत राहिलेल्या दहा ‘अ’राजकीय व्यक्ती

“प्रभू रामाचंद्रांबद्दल अध्यात्मिक ओढ”

‘मला नेहमीच प्रभू रामाचंद्रांबद्दल अध्यात्मिक ओढ होती. त्यामुळेच मी हा खटला लढवण्याचे ठरवलं,’ असं पारासरन सांगतात. आपली बाजू मांडण्याआधी त्यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला. ते रोज सकाळी साडे दहापासून या प्रकरणाचा अभ्यास करायचे. त्यांचे यासंदर्भातील वाचन आणि काम हे सकाळी साडेदहापासून संध्याकाळी उशीरापर्यंत चालायचे.

तरुणांनी केली मदत…

माजी अटॉर्नी जनरल असलेल्या पारासरन यांना या खटल्यामध्ये मदत करण्यासाठी काही तरुण वकीलांची टीम काम करत होती. त्यांच्या टीममध्ये पीव्ही योगेश्वरन, अनिरुद्ध शर्मा, श्रीधर पोट्टाराजू, अदिती दानी, अश्विन कुमार डीएस आणि भक्ती वर्धन सिंह ही तरुण वकील मंडळींनी पारासरन यांच्यासोबत या खटल्याचे काम केलं आहे. ९२ व्या वर्षाच्या पारासरन यांची जिद्द, चिकाटी पाहून या तरुणांनाही हुरुप यायचा.

अभ्यास एवढा की खटल्यातील तारखा होता तोंडपाठ

पारासरन यांचा अयोध्या खटल्याचा इतका अभ्यास होता की ते अनेकदा न्यायलयासमोर खटल्यातील महत्वाच्या तारखा बोलता बोलता सांगायचे असं त्यांच्या टीमधील सदस्य सांगतात. कोणत्या दिवशी काय घडलं होतं हे पारासरन बोटांची आकडेमोड करुन सांगायचे. ‘पारासरन यांनी अयोध्यावर एवढे संशोधन आणि वाचन केले आहे की त्यांच्यावरच एक पुस्तक लिहिता येईल,’ असं या टीमचे सदस्य सांगतात.

त्यांच्यासमोरच कागदपत्रे फाडून फेकली तरी…

अयोध्या सुनावणीदरम्यान पारासरन आणि मुस्लीम पक्षाची बाजू मांडणाऱ्या राजीव धवन यांचा युक्तीवाद झाला होता. धवन हे त्याच्या अभेद्य युक्तीवादासाठी ओळखले जातात. मात्र पारासरन ४० वर्ष या खटल्यावर काम करत राहिले. एकदाही त्यांनी हार मानली नाही. मागील महिन्यामध्ये राजीव धवन यांनी न्यायालयाच्या परवानगीने न्यायालयामध्येच हिंदू पक्षाची बाजू मांडणाऱ्या वक्तव्यांची कागदपत्रे फाडली तेव्हा सुद्धा पारासरन शांत होते. १६ ऑक्टोबर २०१९ रोजी झालेल्या या घटनेनंतर पारासरन यांनी धवन यांची भेट घेतली. दोघांनाही काही काळ एकमेकांबरोबर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी एकत्र फोटोही काढला. यामधून पारासरन यांना एकच संदेश द्यायचा होता. न्यायालयामध्ये एकमेकांविरोधात लढणारे वकील हे एकमेकांविरोधात नसून ही मुद्द्यांची लढाई हेच पारासरन आणि धवन यांना आपल्या कृतीतून दाखवून द्यायचे होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photo of 92 year old k parasaran who presented hindus legal fight for ram mandir in ayodhya goes viral on ram mandir bhoomi pujan day scsg