पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे लाइट बंद ठेऊन, मेणबत्ती, फ्लॅशलाइट लावा असे आवाहन केले. करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. त्यामुळेच आपण सर्वांनी रविवारी रात्री नऊ वाजता घरातील सगळे लाइट्स बंद करुन घराच्या दारात किंवा बाल्कनीमध्ये एक दिवा, मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाई फ्लॅशलाइट लावावी अशा शब्दांमध्ये मोदींनी हे आवाहन केले.

हे नक्की वाचा – Coronavirus Lockdown : रामायण मालिकेने केला धडाकेबाज विक्रम

मोदींच्या या आवाहनानंतर अनेक मीम्स व्हायरल झाले. त्यात बॉलिवूडच्या एका जुन्या चित्रपटाचा फोटो देखील व्हायरल झाला. त्या फोटोत ७०-८० च्या दशकातील आघाडीचे अभिनेते हातात टॉर्च घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. मोदी यांनी ९ वाजता दिवे घालवून हातात टॉर्च घेऊन उभे राहण्याचा सल्ला दिल्यामुळे हा फोटो व्हायरल होत आहे.

हा फोटो नक्की आहे तरी कुठला?

 

हा फोटो अनेक वेळा मीम्स तयार करताना वापरण्यात येतो. मात्र हा फोटो म्हणजे एका बॉलिवूड चित्रपटातील दृश्य आहे. नागिन हा चित्रपट १९७६ साली प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात २० व्या मिनिटाच्या सुमारास हे दृश्य दाखवण्यात आले आहे. नागिन चित्रपटात फिरोझ खान, विनोद मेहरा, कबीर बेदी, सुनील दत्त, अनिल धवन आणि संजय खान हे सहा अभिनेते जंगलात असतात. त्यावेळी अभिनेता जितेंद्र नागाचे रूप घेतात. त्यानंतर त्या सहा अभिनेत्यांपैकी १ जण त्या नागाला गोळी मारतो. त्या चित्रणाच्या वेळी हे सहा अभिनेते अंधारात हातात टॉर्च घेऊन उभे असतात, असे ते चित्रण आहे.

लॉकडाउन काळात केली चोरी अन् थेट गाठलं मॅक्डोनाल्ड्स

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर अनेकांनी ‘मोदींनी केलेलं आवाहन हे अंध:कार घालवण्यासाठी आहे, दिवाळी साजरी करण्यासाठी नाही’, असा टोला अतिउत्साही लोकांना लगावला. कारण २२ मार्च रोजी मोदींनी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांसाठी थाळीनाद करण्यास सांगितले होते. त्यावेळी देशातील अनेक भागांमध्ये लोकांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’ धाब्यावर बसवत एकत्र येत थाळीनाद केला होता. मात्र ही चूक पुन्हा करु नका आपल्या घरामध्येच दिवे लावा, असं आवाहन मोदींनी केलं आहे.