Whatsapp Chat Viral: एका महिलेने एका रिक्रूटरबरोबरचा एक धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय. ज्यात नोएडामध्ये पर्सनल असिस्टंट (पीए) पदासाठी नोकरीच्या संधीबद्दल चर्चा करत असताना, रिक्रूटरने तिला व्हॉट्सअॅपवर विचित्र मेसेज पाठवल्याचा आरोप महिलेने केला आहे.
महिलेने रेडिट पोस्टमध्ये शेअर केला तिचा अनुभव
रेडिट पेज ‘r/IndiaCareers’ वरील एका पोस्टमध्ये, महिलेने लिहिले, “याबद्दल घाबरून जाणे माझे चुकीचे आहे का?” कॅप्शनसह पोस्ट शेअर केली. नोकरीबद्दल बोलताना, महिलेने सांगितले की तिने नोकरीसाठी अर्ज केला होता आणि पगारही वाजवी होता.
तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पगार चांगला आहे, पण ती व्यक्ती/रिक्रूटर खूप विचित्र वागत आहे. मला खात्री आहे की हे कंपनीचे मूल्य नाही. या संभाषणापूर्वी, त्याने मला विचारले की मी विवाहित आहे का! हे खूप निराशाजनक आहे.” असं म्हणत, पोस्टमध्ये रिक्रूटरशी झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट देखील तिने शेअर केला होता.
या स्क्रीनशॉटमध्ये त्या दोघांचं संभाषण दिसत आहे. महिला पगाराबद्दल विचारत असताना रिक्रूटरने तिचा पूर्ण फोटो मागितला. नंतर रिक्रूटरने तिचे इंस्टाग्राम प्रोफाइल मागितले आणि म्हटले की ते “पीए प्रोफाइलसाठी तुमची पर्सनॅलिटी दाखवण्यास” मदत करेल. त्या महिलेचे उत्तर कठोर होते: “मी विचारू शकते का की हे का रेलिवेंट आहे? जर तुम्हाला इंटरव्ह्यू शेड्यूल करायचा असेल, तर मला तिथेच तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आनंद होईल.”
युजर्सनी तक्रार करण्याचा दिला सल्ला
रेडिटवर ही पोस्ट व्हायरल होताच, सोशल मीडिया युजर्सनी रिक्रूटरच्या वर्तनावर टीका केली आणि इतरांना नोकरी शोधताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला. अनेकांनी महिलेला जॉब पोर्टल किंवा संबंधित कंपनीला घटनेची तक्रार करण्याचा सल्ला दिला.