सोशल मीडियाची व्याप्ती किती मोठी आहे हे वेगळे सांगायला नको. हे व्यासपीठ अगदी सर्वेसामान्य माणसांना देखील प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवू शकतो. या वर्षांत असे काही सामान्य चेहरे होते की ज्यांच्या फोटोने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घातला. हे फोटो इतके व्हायरल झाले की ते रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले मग तो पाकिस्तानचा चहावाला असो, भारतीय वंशाची चहावाली असो, नेपाळची भाजीवाली असो की बांग्लादेशी तरूणांच्या मनावर राज्य करणारा अलोम बोगरा असो. एखाद्या सिने तारक तारकांची जितकी चर्चा होते तितक्या मोठ्या प्रमाणात त्यांचीही चर्चा झाली.

भारतीय चहावाली उपमा विरदी
परदेशात उच्चशिक्षण घेणे, तिथेच चांगली नोकरी मिळवणे अशा स्वप्नांची चौकट मोडून उपमा विरदी या चहावालीने भारतीय सोशल मीडियावर धुमाकुळ घातला. व्यवसायाने वकिल असलेली उपमा ऑस्ट्रेलियात चहा विकते. मूळची चंढीगडची असणारी उपमा विरदी ही २६ वर्षांची आहे. ऑस्ट्रेलियात तिने ‘चायवाली’ नावाचे हॉटेल उघडले आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून तिला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तिला या नव्या व्यवसायासाठी २०१६ च्या ‘बिझनेस वुमन ऑफ द इअर’चा पुरस्कार देखील मिळाला. आज ती ऑस्ट्रेलियाच काय पण भारतात सुद्धा ‘चहावाली’ म्हणून प्रसिद्ध आहे.

this-indian-origin-woman-from-australia-got-bussiness-woman-of-the-year-award

निळ्या डोळ्यांचा पाकिस्तानी चहावाला
पाकिस्तानमधल्या पेशावर येथे इतवार बाजारात चहा विकणारा निळ्या डोळ्यांच्या अर्शद खान या चहावाल्याला पाकिस्तानी मुली तर सोडाच पण भारतीय मुलींनी सुद्धा डोक्यावर घेतले. जीया अली खान या महिला छायाचित्रकाराने त्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला होता. त्याला इतकी अफाट प्रसिद्धी मिळाली की रातोरात त्याचे आयुष्यच बदलून गेले. एका फोटोने त्याला मॉडेलिंगच्या अनेक ऑफर मिळाल्या तर त्याच्या वाटेला चित्रपट देखील आले. या चहावाल्याला इतकी प्रसिद्धी मिळाली होती की त्याचा फोटो टाकल्यानंतर दोन दिवस सोशल मीडियावर #chaiwala हा हॅशटॅग ट्रेंडिगमध्ये होता. त्याची तुलना तर अनेक अभिनेत्यांशी झाली होती.

pakistani-chai-wala

पुलावरची सुंदर भाजीवाली
अर्शद खाननंतर काही दिवसात तरुणांना वेडे केले तर नेपाळच्या तारकरीवाली म्हणजेच भाजीवालीने. नेपाळच्या एका पुलावर भाजीची टोपली पाठीमागे अडकवून जाणा-या या मुलींच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले. नेपाळच्या चितवन येथे जन्मललेली कुसुम श्रेष्ठा ही अठरा वर्षांची मुलगी त्यानंतर महिनाभर तरी सोशल मीडियावर चर्चेचा विषयी बनली. पण आपली इतकी चर्चा होत आहे हे मात्र तिला माहितीच नव्हते.

kusum-shrestha-tarkari-wali

‘राजस्थानचा नमो’ श्याम रंगीला
मोदींच्या आवाजाची अगदी हुबेहुब नक्कल करणारा श्याम रंगीला हा मिमिक्री आर्टिस्ट तर भारतीय नेटीझन्सना अधिकच भावला. नोटाबंदीनंतर त्यांनी केलेल्या मोदींच्या मिमिक्रीचे व्हिडिओ लगेच व्हॉट्स अॅप, ट्विटर, फेसबुस सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मुळचा राजस्थानचा असलेल्या हा श्याम रंगिलाला आज नेटीझन्स ‘राजस्थानचा नमो’ या नावानेच ओळखतात.

shyam-rangeela-1

बांग्लादेशी तरूणींच्या हृदयावर राज्य करणारा अलोम बोगरा
खरे तर अलोम बोगरा हा भारतीय सोशल मीडियावर एक विनोदाचा भाग ठरला. ज्यासोबत एक सेल्फी काढण्यासाठी मुली तासन् तास रांगेत उभे राहतात अशा अलोममध्ये नक्की काय जादू आहे याचे कोडे अद्यापही न उलगडण्यासारखेच आहे. पण मॉडेलिंग आणि अभिनेता म्हणून अलोम बोगरा हा बांग्लादेशमध्ये प्रसिद्ध आहे. युट्युबवर त्याच्या व्हिडिओंना सर्वाधिक पसंती आहे.

alom-bogra

बेवफा सोनम गुप्ता
नोटाबंदीनंतर सर्वाधिक चर्चा झाली ती सोनम गुप्ताची. या सोनम गुप्ताला अद्यापही कोणी बघितले नाही पण तिच्या बेवफाईचे चर्चे अगदी क्रिकेटच्या मैदानापर्यंत रंगले होते. ही सोनम गुप्ता कोण आणि तिच्या प्रियकर कोण याच्या उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या. जिला अद्यापही कोणी पाहिले नाही पण सर्वाधिक प्रसिद्धी लाभलेली सोनम गुप्ता ही एकमेव व्यक्ती असेल. इतकेच नाही तर गुगलने २०१६ मध्ये सर्वाधिक शोध घेतल्या गेलेल्या व्यक्तींची नावे जाहिर केलीत त्या यादीतही ही बेवफा सोनम तिस-या क्रमांकावर होती.

sonam-gupta

सिंगापूरचा रुबाबदार सुरक्षारक्षक
पाकिस्तानी चहावाला, तारकरीवाली यांची जादू नेटीझन्सवरून उतरते न उतरते तोच सिंगापूरच्या शांघा विमानताळावरील सुरक्षा रक्षकाचे फोटो व्हायरल होऊ लागले. ‘सर्टीस सिस्को’ नावाच्या सुरक्षा पुरविणाऱ्या कंपनीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या सुरक्षारक्षकाचा फोटो ट्विटरवरून शेअर केला होता. त्यानंतर काही दिवस नेटीझन्सना चर्चेसाठी नवा विषय मिळाला होता.

singapores-changi-airport-security-officer