सोशल मिडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल झाली असून यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना अर्ध्या किंमतीमध्ये ट्रॅक्टर उपलब्ध करुन देत असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, सरकारने पंतप्रधान शेतकरी ट्रॅक्टर योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ध्या किंमतीमध्ये ट्रॅक्टर दिला जात आहे. जाहिरातीनुसार सरकार पंतप्रधान शेतकरी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत पाच लाख रुपये देत आहेत. हा मेसेज सध्या प्रचंड व्हायरल झाला असून याची दखल घेत थेट सरकारच्या पत्रसूचना विभागालाच (पीआयबी) याबद्दल खुलासा करावा लागला आहे.

व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी पीआयबीने ‘पीआय़बी फॅक्ट चेक’ नावाने एक ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे. या अकाऊंटवरुन व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता पताळून त्यासंदर्भात थेट सरकारकडूनच स्पष्टीकरण दिलं जातं. याच ट्विटर हॅण्डलवरुन ट्रॅक्टरसाठी केंद्र सरकारकडून पाच लाख रुपये देण्यात येत असल्याची पोस्ट खोटी असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. पीआयबी फॅक्टचेक (@PIBFactCheck) या ट्विटर अकाऊंटवरुन व्हायरल पोस्टचा फोटो शेअर करत ही जाहिरात खोटी असल्याचे सांगण्यात आलं आहे. केंद्र सरकार पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत अर्ध्या  किंमतीमध्ये ट्रॅक्टर उपलब्ध करुन देत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून अशी कोणतीही योजना राबवण्यात येत नाहीय, अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे.

अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर एक बातमी व्हायरल झाली होती ज्यामध्ये भारत सरकार युरियाच्या वापरावर निर्बंध घालण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात आला होता. या बातमीबरोबर एका वृत्तपत्रामधील बातमीचे कात्रण व्हायरल झालं होतं. ‘शेतीत होणारा युरियाचा वापर सरकार थांबवणार’, असा या वृत्ताचा मथळा होता. मात्र इंटरनेटवर अशी कोणतीही बातमी आढळून आली नाही ज्यावरुन केंद्र सरकार युरियाच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे ठामपणे म्हणता येईल. पीआयबी फॅक्टचेकनेही हा दावा फेटाळून लावत ही युरियासंदर्भातील ही पोस्ट अफवाच असल्याचे स्पष्ट केलं होतं. सरकारने असा कोणताही निर्णय न घेतल्याचे पीआयबीने म्हटलं होतं.