Chandrayaan 3: भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान ३’ चंद्राच्या दिशेने झेपावले. १४ जुलै रोजी दुपारी २.३५ मिनिटांनी चंद्रायानाचे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आले होते. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या यानातील लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात येणार आहे. शिवाय इस्रोची ही मोहिम यशस्वी व्हावी म्हणून अनेकांनी शुभेच्छादेखील दिल्या आहेत. चांद्रयानाचे प्रक्षेपण केल्यानंतर काही क्षणातच ते ढगांना भेदत आकाशाच्या दिशेने गेले. यावेळी अनेकांनी या चांद्रयानाचे फोटो आणि व्हिडीओ शूट केले, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण हे सर्व फोटो लोकांना एक ते दोन मिनिटापर्यंतच काढता आले, कारण या रॉकेटचा वेग इतका होता की ते काही क्षणात ढगात गायब झाले होते.
दरम्यान, हे चांद्रयान ढगात उंच जाताना एका विमानातून त्याचा व्हिडीओ शूट करण्यात आला होता. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अशातच आता आणखी एक असाच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो ‘चांद्रयान ३ लाँच केल्यानंतर सुमारे ३० मिनिटांनी काढण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
प्रक्षेपणानंतर ३० मिनिटांनी काढलेला फोटो व्हायरल –
महत्वाची बाब म्हणजे हा फोटो ऑस्ट्रेलियातून काढण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातील रात्रीच्या आकाशात चांद्रयान ३ दिसत असलेला एक फोटो व्हायरल होत आहे, जो फोटो डायलन ओ’डोनेलने यांने काढला आहे. १४ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून चंद्र मोहिमेचे प्रक्षेपण केल्यानंतर सुमारे ३० मिनिटांनी त्याने हा फोटो काढला होता. ओ’डोनेल हा फोटो ट्विटवर शेअर केला आहे. यावेळी त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं “आत्ताच YouTube वर भारताच्या अंतराळ संस्थेने चंद्रावर त्यांचे रॉकेट लाँच केल्याचे पाहिलं आणि ३० मिनिटांनंतर माझ्या घरावरुन जाताना मी ते पाहिले, अभिनंदन इस्रो, आशा आहे की तुम्ही लँडिंग कराल..”
चंद्रयान-३ काय माहिती मिळवणार?
चंद्रयान-३च्या सहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागाची रचना, भूवैज्ञानिक वैशिष्टय़े आणि इतर माहिती मिळविली जाणार आहे. चंद्राची आवरणशिला, भूगर्भातील हालचाली, पृष्ठभागावरील प्लाझ्माचे प्रमाण, चांद्रपृष्ठातील रासायनिक मूलद्रव्ये इत्यादी गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे.