जंगलांचा आकार कमी करून मनुष्यप्राण्यानं तिथे आपले इमले उभे केले आणि नाईलाजाने तिथले वन्यप्राणी मनुष्यप्राण्याच्या ‘जंगला’त शिरले! त्यामुळे वेळोवेळी असे प्राणी मनुष्यवस्तीत आढळून आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा अनेक प्रसंगी काही ठिकाणी हे प्राणी आक्रमक झाल्याचंही दिसून आलं आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये एक वाघ कोणत्याही आक्रमक पवित्र्याशिवाय एका घराच्या भिंतीवर ठाण मांडून बसल्याचं दिसून आलं. ‘आता इथून हलायचंच नाही’ असाच चंग बांधून जणू हा वाघ या भिंतीवर रात्रभर बसून होता. शेवटी त्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना नानाविध क्लृप्त्या कराव्या लागल्या!
पिलीभीत व्याघ्र प्रकल्पातून वाघ थेट गावात!
सोमवारी संध्याकाळी हा वाघ उत्तर प्रदेशच्या पिलीभीत व्याघ्र प्रकल्पातून नजीकच्या गावात शिरल्याची माहिती समोर आली आहे. रात्री हा वाघ तिथल्या एका घराच्या भिंतीवर चढून बसला. गावकरी झोपेत असल्यामुळे वाघ गावात येऊन बसल्याची त्यांना कोणतीही कल्पना नव्हती. गावातल्या कुत्र्यांनी भुंकून भुंकून गावकऱ्यांना जागं केलं. गावातल्या एका घरावर वाघ बसल्याचं समजताच गावकऱ्यांच्या पाचावर धारण बसली!
एव्हाना रात्रीच्या अंधारात वाघाला बघण्यासाठी गावकऱ्यांनी तुफान गर्दी केली होती. पण आपण वाघाला बघायला जायचो आणि वाघाची नजर चुकून आपल्यावर पडली तर काय? अशी भीतीही प्रत्येक गावकऱ्याच्या मनात होती. त्यामुळे या भिंतीपासून चार हात लांबच उभं राहून गावकरी वाघाला याची देही याची डोळा पाहण्याचं धैर्य करू धजावत होते! हा वाघ आक्रमक न होता शांतपणे त्या भिंतीवर बसून राहिल्यामुळे गावकऱ्यांना काहीसा धीरही मिळत होता. रात्रभर या वाघाची उठण्याची वाट पाहून पाहून गावकरी थकले. पण वाघ काही जागचा हललाच नाही!
सकाळी वन विभागाचे कर्मचारीही वाघाला हलवण्याचा प्रयत्न करू लागले. पण वाघोबा महाशयांनी भिंतीवर मांडलेलं ठाण सोडण्यास ते तयार नव्हते. मध्येच वाघ मान वर करून आसपासच्या गावकऱ्यांकडे नजर टाकताच गावकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठत होता. पण एवढंच करून वाघोबा पुन्हा आपल्या झोपेच्या मुद्रेत जात होते. वाघानं अचानक झेप घेऊन गावकऱ्यांना जखमी केलं तर काय? या शक्यतेनं वन विभागानं या भिंतीच्या भोवती सुरक्षित अंतरावर संरक्षक जाळी बांधली होती. त्यापलीकडे अगदी घरांच्या छतावर, रस्त्यावर वाघाला बघण्यासाठी गावकऱ्यांची काठोकाठ गर्दी दिसत होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही आणि खुद्द वाघालाही!
हेलिकॉप्टरमधून व्हिडीओ शूट करताना हातातून निसटला मोबाइल अन्…; हा Video पाहून तुम्हीही जोरजोरात हसाल
अखेर वाघोबा खाली आले!
शेवटी वाघाला खाली उतरवण्यासाठी वनविभागानं त्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शनचा वापर केला. त्यासरशी कसनुसं करत वाघ खाली आला खरा, पण तो पिंजऱ्यात काही केल्या जाईना. वनविभागाचे अधिकारी अगदी त्याची शेपूट पकडून त्याला पिंजऱ्यात घालू पाहात होते. पण वाघ मात्र औषधाच्या गुंगीतही पुन्हा उठून तिथून पळ काढण्याच्या तयारीत होता. शेवटी अनेक प्रयत्न करून त्याला पिंजऱ्यात कैद करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलं आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला!