Pilot Dies Mid Air: मायामी ते चिली विमानप्रवासाच्या दरम्यान पायलटचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या विमानात त्यावेळी २७१ प्रवासी होते. LATAM एअरलाइन्सच्या ५६ वर्षीय पायलट इव्हान अंदौर यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. सॅंटियागोला जाणाऱ्या बोईंग ७८७-९ ड्रीमलायनर विमानात ही दुर्दैवी घटना घडली. विमानाने उड्डाण घेताच पहिल्या ४० मिनिटातच इव्हान यांना त्रास जाणवू लागला होता त्यावेळेस त्यांनी विमानात कोणी डॉक्टर आहे का याबाबत विचारणा केली होती.
इव्हान यांना हार्ट अटॅक आल्यावर विमानातील इसाडोरा नावाच्या नर्सने, दोन डॉक्टरांसह, लँडिंग दरम्यान अंदौर यांचा जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण त्यांना आलेला हृदयविकाराचा झटका इतका तीव्र होता की वैद्यकीय तज्ज्ञांच्या कठोर परिश्रमानंतर सुद्धा त्यांना यश आले नाही. पायलट इव्हान यांच्या मृत्यूनंतर अशा गंभीर आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी प्रोटोकॉलमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे असे इसाडोरा यांनी म्हटले. प्राप्त माहितीनुसार, मुख्य पायलट इव्हान यांच्या निधनानंतर पनामा शहरातील टोकुमेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यावेळी प्रवाशांनी आपबिती सांगितली.
हे ही वाचा<< “देशद्रोही, डोकं फिरलंय का?” प्रसिद्ध गायकाच्या ‘शूज’ वरून नेटकऱ्यांचा संताप; म्हणाले, “स्वातंत्र्य दिनालाच यांना…”
दरम्यान, पुढील मंगळवारी फ्लाइट ऑपरेशन्स पुन्हा सुरू होईपर्यंत प्रवाशांना पनामा सिटी हॉटेल्समध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती. लॅटम एअरलाइन्सने द इंडिपेंडेंटच्या माध्यमातून एक निवेदन जारी करून घटनेची पुष्टी केली आहे. तसेच इव्हान यांचा जीव वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात आले होते असेही एअरलाईनकडून सांगण्यात आले आहे.