प्रत्येक मुलाची इच्छा असते की, त्याने त्याच्या आयुष्यात असं काम करावं की ज्यामुळे त्याच्या आई-वडिलांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे. आपल्या आई-वडिलांना आनंदी पाहण्यासाठी प्रत्येक मुलं आपल्यापरीने प्रयत्न करत असतात. अशाच एका वैमानिक असलेल्या मुलाने त्याच्या पालकांसाठी सर्वात गोड सरप्राईज दिले आहे. ज्यामुळे त्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुललंय. त्याने असं काय केलं असेल, तुम्ही देखील विचार करत असाल ना? या वैमानिकाने त्याच्या आई-वडिलांना विमानाने राजस्थानच्या जयपूर येथील घरी आणले. मात्र, जेव्हा आई-वडील विमानात चढले तेव्हा त्यांना माहीत नव्हतं की, त्यांचा मुलगा हे विमान उडवणार आहे. जेव्हा त्यांना हे कळलं त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता.
पायलट कमल कुमार यांनी इंस्टाग्रामवर एक हृदयस्पर्शी क्लिप शेअर केली आहे. ज्याला २ दशलक्षहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या क्लिपमध्ये त्याचे आई-वडील नकळत विमानात चढताना दाखवतात. नंतर अचानक ते आपल्या मुलाला कॉकपिटच्या प्रवेशद्वारावर पाहतात. त्यानंतर त्याची आई आपल्या मुलाला पाहून थोडावेळ थांबते आणि त्याचा हात धरून आनंदाने हसते. या क्लिपमध्ये वैमानिक त्याच्या कुटुंबीयांसह कॉकपिटमध्ये बसल्याचे चित्रही दाखवले आहे.
“मी उड्डाण सुरू केल्यापासून याची वाट पाहत होतो आणि शेवटी मला त्यांना जयपूरला घरी घेऊन जाण्याची संधी मिळाली. ही एक सुंदर भावना आहे,” त्याने या कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे.
( हे ही वाचा: बेडवर उशी ठेवून ‘युट्यूब’ पाहणाऱ्या स्मार्ट माकडाचा व्हिडीओ झाला व्हायरल; पहा VIRAL VIDEO)
हा व्हिडीओ पाच दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आला असून काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओला भरभरून प्रेम दिले असून, वैमानिकाचे कौतुक देखील केले आहे. तसंच या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एकाने म्हटलंय हा खूप “हृदयस्पर्शी” व्हिडीओ आहे. तर दुसऱ्याने म्हटलंय “मी आज पाहिलेली सर्वात सुंदर गोष्ट आहे” तर अजून एकाने म्हटलंय “तुझ्या पालकांना तुझा नक्की अभिमान वाटला असेल”