Pit Bull killed King Cobra: श्वान हा आपल्या मालकाशी प्रामाणिक असतो, याची असंख्य उदाहरणे आजवर आपण पाहिली आहेत. अनेक वर्षांपासून माणूस आणि श्वान यांचे जवळचे नाते राहिले आहे. श्वान आणि माणसाचे नाते किती घट्ट असते, याचे उदाहरण दाखविणारा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. उत्तर प्रदेशच्या झाशीमधील एका घरात विषारी किंग कोब्रा जातीचा साप शिरला होता. घरातील अंगणात त्यावेळी लहान मुले खेळत होती. विषारी साप लहान मुलांना दंश करणार, अशी शंका असताना मुलांबरोबर खेळणारा पिट बुल जातीचा श्वान धावून गेला आणि अवघ्या काही मिनिटांत त्याने सापाला आपल्या जबडद्यात धरून मारून टाकले.

झाशीमधील शिव गार्डन कॉलनीधील एका बंगल्यात मुले खेळत होती. यावेळी अचानक एक नाग आल्यामुळे मुलांनी एकच गोंधळ सुरू केला. यावेळी अंगणाच्या एका कोपऱ्यात जेनी नावाचा पिट बुल श्वान बांधलेला होता. मुलांचा ओरडण्याचा आवाज ऐकून श्वानाने आपला पट्टा तोडून मुलांना वाचविण्यासाठी धाव घेतली.

हे वाचा >> “हेच ते कलियुग…”, ८० वर्षांच्या पतीकडून पोटगी मागितल्यानंतर उच्च न्यायालयाची प्रतिक्रिया

या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, पिट बुल नागाला आपल्या जबड्यात धरून आपटत आहे. पाच मिनिटांपर्यंत पिट बुल आणि नागाची झटापट सुरू होती. अखेर पिट बुलचा या लढतीत विजय झाला आणि त्याने नागाला मारून टाकले. पिट बुल जेनीचे मालक पंजाब सिंह यांनी माध्यमांना सांगितले की, जेनीने साप मारण्याची ही पहिलीच वेळ नाही. आधीही जेनीने हा पराक्रम केला आहे. आतापर्यंत जेनीने आठ ते दहा सापांना मारले आहे.

व्हायरल व्हिडीओमधील घटना ज्यादिवशी घडली, त्यादिवशी पंजाब सिंह हे घरी नव्हते. जेव्हा त्यांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना जेनीचे कौतुक वाटले. लहान मुले खेळत असल्यामुळे विषारी नाग जर त्यांच्या जवळ गेला असता तर काहीही घडू शकले असते. जेनीमुळे लहान मुले वाचली, असे सिंह म्हणाले. “मी त्यावेळी घरी नव्हतो. पण माझा मुलगा आणि नातू घरी होते. आमच्या घरात नेहमी साप येत राहतात. जंगलाच्या जवळच आमचे घर असल्यामुळे पावसाळ्यात अनेकवेळा साप आत शिरला आहे. जेनीने आतापर्यंत ८ ते १० साप मारले आहेत”, असे पंजाब सिंह म्हणाले.

पंजाब सिंह पुढे म्हणाले, “मला माझ्या श्वानाचा अभिमान आहे. इतरही लोकांनी प्राण्यांवर प्रेम करायला हवे. आजकाल अनेक लोक प्राणी पाळणे टाळत आहेत. पण माणूस जे काम करू शकत नाही, ते काम प्राणी करतात. त्यामुळे आपण प्राण्यांवर प्रेम केले पाहीजे. पिट बुल जातीच्या श्वानाबद्दल अनेकजण नकारात्मक गोष्टी सांगतात. पण माझ्या पिट बुल श्वानाने आजवर एकाही माणसाला त्रास दिलेला नाही.”