Ration Shop Viral Video : राज्यात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना राज्य सरकारमार्फत महिन्याला मोफत तांदूळ आणि गहू वितरीत केले जाते. मात्र, अलीकडे रेशनिंगवर मिळणाऱ्या तांदळात प्लास्टिकसदृश तांदूळ मिळत असल्याची तक्रार अनेक लोक करत आहेत. यामुळे रेशनिंगवर निकृष्ट दर्जाचे तांदूळ मिळतात, असा समज अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे हा रेशनिंगवरील तांदूळ खावा की नाही याबाबतही लोक प्रश्न विचारू लागले आहेत. जर तुम्हालाही रेशनिंगच्या तांदळात असे तांदूळ आढळले तर काळजी करू नका. कारण ते प्लास्टिकचे नाही तर तो फोर्टिफाईड अर्थात पौष्टिक तांदूळ आहे. पण, सोशल मीडियावर अनेक जण हा प्लास्टिकचा तांदूळ असल्याचे म्हणत विविध पोस्ट व्हिडीओ शेअर करत आहेत.
नक्की तांदूळच आहेत की दुसरं काही?
अशाचप्रकारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने रेशनिंगवर मिळालेल्या तांदळातून फोर्टिफाईड अर्थात पौष्टिक तांदूळ बाजूला केलेत. पण, या व्यक्तीलाही फोर्टिफाईड तांदळांबद्दल माहिती नसल्याने तोही संभ्रमात आहे. यात तो सांगतोय की, हे तांदूळ शिजवल्यानंतर त्याचे बारीक पीठ होते, त्यामुळे हा तांदळाचा कोणता प्रकार आहे, नक्की तांदूळच आहेत की दुसरं काही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण, घाबरू नका, हा खाण्यायोग्य असाच तांदूळ आहे.
शासनाकडून गोरगरिबांना महिन्याला रेशनचा पुरवठा केला जातो. यात पौष्टिकता वाढवण्यासाठी आता फोर्टिफाईड अर्थात पौष्टिक तांदूळ मिक्स केला जातो, मात्र काही लाभार्थी रेशनिंगचा तांदूळ शिजवल्यानंतर त्यातून चिकट पदार्थ बाहेर येत असल्याची तक्रार करत होते, त्यामुळे अनेकांमध्ये या तांदळाविषयी भीती निर्माण झाली होती. मात्र, हा तांदूळ पौष्टिकच असून कोणताही गैरसमज न बाळगता खाण्याचे आवाहन शासनाने केले आहे.
पण, या तांदळाविषयी अनेक लोकांना माहिती नसल्याने त्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी शासनाने एक चांगला उपक्रम राबवावा, असे आवाहन केले जात आहे.