देशातील ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी आयोजित केलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक ही, बैठकीमधील चर्चेपेक्षा राजकीय वादावरुन चांगलीच चर्चेत आल्याचं चित्र दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या बैठकीचे ‘थेट प्रक्षेपण’ केल्यामुळे संतापलेल्या भाजपने केजरीवाल यांच्या ‘माफीनाम्या’ची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून ‘ऑक्सिजनच्या राजकारणा’वर प्रत्युत्तर दिले. मात्र या बैठकीमधील पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या आक्षेपाबरोबरच आणखीन एक मुद्दा सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे तो म्हणजे, मोदींनी बैठकीदरम्यान मास्क घालणं. पंतप्रधान मोदी बंद दरवाजाआड असणाऱ्या बैठकीमध्ये मास्क घालून उपस्थित राहतात, मात्र पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारांदरम्यान मास्क घालताना दिसत नाही अशी टीका सोशल नेटवर्किंगवर होताना दिसत आहे. मोदी प्रचारसभेत मास्क घालत नाहीत पण बंद दाराआड बैठक असताना मास्क घालतात, असं का आहे असा प्रश्न अनेकांनी विचारल्याचं पहायला मिळत नाही.

मोदींनी मास्क घालून बैठकीला उपस्थिती लावल्याने अनेकांनी हे नाटक असल्याची टीका सोशल नेटवर्किंगवरुन केलीय. उत्तर प्रदेशमधील माजी आयएएस अधिकारी असणाऱ्या सुर्य प्रताप सिंह यांनीही, मोदींच्या या बैठकीतील फोटो पोस्ट करत, “प्रचारसभांना मास्क नाही, बंद दाराआडील बैठकीमध्ये मास्क?, मोदीजी पुरं झालं मोदीजी…”, असं ट्विट केलं आहे.

रैली में मास्क नहीं, क्लोज डोर मीटिंग में मास्क?

मोदी जी, बस करो मोदी जी। pic.twitter.com/LyyYlsiI8Q

— Surya Pratap Singh IAS Rtd. (@suryapsingh_IAS) April 23, 2021

सुर्य प्रताप सिंहच नाही तर अनेकांनी यासंदर्भात ट्विटरवरुन नाराजी व्यक्त करत मोदींनी मास्क घालून बंद दाराआडील बैठकीला बसणं म्हणजे दिखावा असल्याची टीका केलीय.

१) एक ही तो दिल है, कितनी बार जीतोगे मोदी जी…

२) देशातील नागरिकांच्या जीवाची काळजी करा

३) वाह रे दिखावा…

४) कमाल करता तुम्ही…

५) बैठकीला मास्क आणि सभेला नाही…

बैठकीत मोदी विरुद्ध केजरीवाल…

दिल्लीत ऑक्सिजनची मोठी टंचाई असून एखादी भयानक दुर्घटना झाली तर जबाबदार कोण? शेजारील राज्यांकडून ऑक्सिजनचे टँकर अडवले जात आहेत. आपत्कालीन परिस्थितीत केंद्रात कोणाशी संपर्क साधायचा? पंतप्रधान म्हणून तुम्ही मार्गदर्शन करा, असे बैठकीत केजरीवाल पंतप्रधानांना म्हणाले. बैठकीत केजरीवाल यांचे हे म्हणणे वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केले जात होते. केजरीवाल यांनी पंतप्रधान कार्यालयाला न सांगताच बैठकीतील घडामोडी प्रक्षेपित केल्यामुळे भाजपने आम आदमी पक्षावर शाब्दिक हल्लाबोल केला. केजरीवाल यांनी गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. मात्र, या बैठकीतील कोणतीही गोपनीय माहिती प्रसारित केली गेली नसल्याचा दावा केजरीवाल यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाने केला. बैठकीचे थेट प्रक्षेपण न करण्याचे कोणतेही संकेत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री कार्यालयाने भाजपच्या आरोप फेटाळून लावले.

या बैठकीत केजरीवाल म्हणणे मांडत असताना पंतप्रधान मोदी यांनी त्यांना अडवले. ‘परंपरा आणि शिष्टाचार न पाळता या खासगी बैठकीचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. एखाद्या मुख्यमंत्र्याकडून अशी बाब होणे योग्य नसून त्यांनी संयम पाळला पाहिजे’, अशा शब्दांत मोदींनी आक्षेप नोंदवला. त्यावर भविष्यात  या सूचनेचे पालन केले जाईल, असे सांगत केजरीवाल यांनी माफी मागितली.

Story img Loader