G20 Summit Delhi 2023: राजधानी दिल्लीत जगातील प्रभावशाली राष्ट्रांचे प्रमुख जी २० शिखर परिषदेसाठी एकत्र आले आहेत. दोन दिवसांच्या या परिषदेमध्ये जागतिक अर्थकारण व शाश्वत विकास यासंदर्भात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्व राष्ट्रे मिळून या परिषदेच्या शेवटी संयुक्त निवेदन देण्याचीही चर्चा आहे. एकीकडे परिषदेतील मुद्द्यांपासून जेवणाच्या मेन्यूपर्यंत सर्व गोष्टींची चर्चा असताना दुसरीकडे आता एक चर्चा नव्याने सुरू झाली आहे. या जागतिक परिषदेच्या डिनरसाठी मोदी सरकारने अदानी-अंबानींसह देशातील प्रमुख व्यावसायिकांनाही निमंत्रित केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा दावा खोटा असल्याचं पीआयबी फॅक्टचेकच्या हवाल्याने एएनआयनं म्हटलं आहे.
नेमकी काय आहे चर्चा?
ही सर्व चर्चा एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तावरून सुरू झाली होती. या वृ्त्तानुसार, दिल्लीतील जी २० परिषदेदरम्यान पहिल्या दिवशी, म्हणजेच शनिवारी संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या डिनरसाठी सर्व सहभागी राष्ट्रप्रमुखांबरोबरच देशातील प्रमुख व्यावसायिकांनाही पाचारण करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं होतं. यामध्ये मुकेश अंबानी, गौतम अदानी, एन. चंद्रशेखरन, कुमार मंगलम बिर्ला, सुनील मित्तल यांचा समावेश असल्याचं या वृत्तात म्हटलं होतं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलेमान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेऊ आणि जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यासमवेत हे उद्योगपती डिनर करणार असल्याचाही दावा करण्यात आला होता.
सत्य काय?
दरम्यान, एएनआय या दुसऱ्या एका वृत्तसंस्थेनं पीआयबी फॅक्ट चेकच्या हवाल्याने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. पीआयबी फॅक्टचेक ही केंद्र सरकारची एक शाखा असून याद्वारे खोट्या वृत्तांचं सत्य जाहीर केलं जातं. पीआयबी फॅक्टचेकच्या ट्विटर हँडलवर यासंदर्भात ट्वीट करून माहिती देण्यात आली आहे. ‘कोणत्याही उद्योगपतीला जी २० परिषदेच्या डिनरसाठी आमंत्रित करण्यात आलेलं नाही. यासंदर्भात करण्यात आलेला दावा खोटा आहे’, असं या वृत्तात म्हटलं आहे.
जी २० शिखर परिषदेला सुरुवात
एकीकडे परिषदेसंदर्भातली रंजक माहिती समोर येत असताना दुसरीकडे दिल्लीच्या प्रगती मैदानमधील भारत मंडपममध्ये जी २० परिषदेला सुरुवात झाली आहे. “जागतिक पातळीवर कमी होत चाललेल्या विश्वासाचं वातावरण वाढवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्र प्रयत्न करायला हवेत”, असं आवाहन यावेळी आपल्या प्रारंभीच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतर सदस्य राष्ट्रप्रमुखांना केलं.