पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमामध्ये झळकणार आहेत. ही माहिती काही दिवसापूर्वी ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बेअर ग्रिल्सने ट्विटरवरुन दिली होती. जगभरातील १८० देशांच्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची या आधी कधीही न पाहिलेली बाजू पहायला मिळणार आहे. नुकताच या शोचा नवा ट्रेलर प्रदर्शित झाला असून काही कालावधीमध्येच तो लोकप्रियही झाला आहे.

प्रदर्शित झालेला  ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यामध्ये पंतप्रधान मोदी बेअर ग्रिल्ससोबत जंगल सफारी करताना दिसत आहेत. यावेळी बेअरने मोदी यांना जंगल सफारी करतानाचे अनेक बारकावे सांगितल्याचं पाहायला मिळालं. तर मोदी यांनीदेखील त्यांच्या जीवनातील अनेक अनुभव शेअर केले.

या ट्रेलरमध्ये बेअर पंतप्रधान मोदी यांना जंगली श्वापदांपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी हत्यारांचा वापर कसा करायचा हे सांगत होता. यावेळी त्याने चाकू काठीला बांधत त्याचा भाला म्हणून वापर कसा करायचा हेदेखील सांगितलं. मात्र “एखाद्याला ठार मारण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत”, असं उत्तर मोदींनी दिलं. विशेष म्हणजे ज्यावेळी गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांड झालं होतं. त्यावेळी पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे अनेकांनी त्यांना गोध्रा हत्याकांडासाठी जबाबदार ठरवलं होतं. मात्र आता ‘मॅन वर्सेस वाईल्ड’च्या ट्रेलरमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं आहे, त्यामुळे अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदी ‘मॅन वर्सेस वाईल्ड’मध्ये येणार असल्याची घोषणा बेअरने केल्यानंतर ट्विटरपासून फेसबुकपर्यंत मोदींच्याच नावाची चर्चा आहे. इतकंच नाही तर ट्विटरवर या कार्यक्रमासंदर्भातील #PMModionDiscovery, Bear Grylls असे हॅशटॅगही लोकप्रिय झाल्याचं पाहायला मिळालं.