भावाबहिणीच्या हक्काचा, प्रेमाचा सोहळा म्हणजे रक्षाबंधन. या प्रेमाला कोणत्याही धर्माची, देशाची सीमा नसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा त्यांच्या पाकिस्तानी बहिणीने राखी पाठवली आहे. मोदींची बहीण कमर मोहसिन शेख या मागील २५ वर्षांपासून दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्त राखी पाठवून आपल्या भावाला शुभेच्छा व आशीर्वाद पाठवतात. यंदा सुद्धा त्यांची राखी मोदींपर्यंत पोहचली असून सोबत एक भावनिक पत्र जोडलेले आहे. यंदाच्या पत्रात त्यांनी भावाला कशा शुभेच्छा दिल्या आहेत हे पाहुयात..
मोहसिन शेख यांनी सांगितले की “मला यंदा सुद्धा मोदींना भेटायला मिळेल अशी आशा आहे. राखी बांधण्यासाठी मोदी मला नवी दिल्लीला बोलावून घेतील यासाठी मी सर्व गोष्टी तयार ठेवल्या आहेत. ही राखी मी रेशमी धाग्याने विणून स्वतः तयार केली आहे”.
पंतप्रधान मोदींना खास पत्र
मोहसिन शेख यांनी राखीसोबत एक पत्र सुद्धा पाठवले आहे, यात भावाच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहेत, तसेच आगामी २०२४ मधील निवडणुकीसाठी सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान होणार हे निश्चित आहे, हे प्रेम त्यांनी स्वतः कमावले आहे असे शेख यांनी पत्रात म्हंटले आहे.
कोण आहेत मोहसीन शेख?
मोहसीन शेख या पाकिस्तानी असून लग्नानंतर त्या भारतात आल्या व सध्या त्या अहमदाबाद मध्ये स्थायिक आहेत. नरेंद्र मोदी आरएसएसचे कार्यकर्ते असताना त्यांची ओळख मोहसीन यांच्याशी झाली होती. एकदा दिल्ली मध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी योगायोगाने त्यांची भेट झाली व तेव्हा शेख यांनी मोदींना राखी बांधून सण साजरा केला होता. २०१७ साली पंतप्रधान कामात व्यस्थ असतील असे वाटत होते मात्र त्यांनी रक्षाबंधनाच्या दोन दिवसांपूर्वी मला आठवणीने फोन केला त्यांनतर मी नवी दिल्ली मध्ये जाऊन त्यांना राखी बांधली.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने होणाऱ्या कॉल मध्ये मोदी आवर्जून माझे पती व माझा मुलगा सुफियान यांच्याविषयी प्रेमाने विचारपूस करतात, हे पाहून मला मी या जगात सर्वात नशीबवान आहे असे वाटते असेही मोहसीन यांनी सांगितले.
यंदा ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा होणार आहे. यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.