पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या २७०० भेटवस्तूंचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे. १४ सप्टेंबर रोजी या भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या भेटवस्तूंची किंमत २०० रुपयांपासून सुरु होत आहे, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा http://www.pmmementos.gov.in या संकेतस्थळावर लिलाव करण्यात येणार आहे. या वस्तूंची किंमत २०० रुपयांपासून ते २.५ लाख रुपयांपर्यंत आहे. या लिलावातून मिळणारी रक्कम केंद्र सरकारतर्फे गंगेच्या स्वच्छतेसाठी असलेल्या ‘नमामी गंगे’ या मोहिमेच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे.

दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या जवळपास १८०० भेटवस्तूंचा काही दिवसांपूर्वीच लिलाव करण्यात आला होता. आता पुन्हा भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे.