देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं उत्तरेकडच्या तीन राज्यांमध्ये बाजी मारली. राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. तर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सर्व दावे फोल ठरवत भाजपानं सत्ता कायम राखली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्ली मुख्यालयात केलेल्या भाषणात या विजयावरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना टोले लगावले होते. आता मोदींच्या एक्सवरील (ट्विटर) अकाऊंटवरून पहिल्यांदाच इमोजींचा वापर करून पोस्ट करण्यात आली आहे!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्यांदाच मोदींकडून स्मायली इमोजीचा वापर!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तिगत अधिकृत खात्यावरून नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यांवर पोस्ट केल्या जातात. त्यांच्या या खात्याचे कोटींच्या घरात फॉलोअर्सदेखील आहेत. आत्तापर्यंत किमान पंतप्रधान झाल्यापासून तरी मोदींच्या या खात्यावरून अतिशय साध्या आणि स्पष्ट शब्दांमध्ये पोस्ट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. मात्र, स्मायलीसारख्या इमोजीजचा वापर केल्याचं दिसून आलं नाही. आज मात्र निवडणूक निकालांसंदर्भात एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या त्याच वाहिनीच्या वृत्तनिवेदकाची एक पोस्ट पुन्हा शेअर करत मोदींच्या अधिकृत खात्यावरून विरोधकांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

काय म्हटलंय या पोस्टमध्ये?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खात्यावरून करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये मोदींनी इंडिया टुडेचे वृत्तनिवेदक शिव अरूर यांचा एक व्हिडीओ शेअर करणाऱ्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. “त्यांना त्यांच्या उद्धटपणा, खोटेपणा, निराशा, दुर्लक्ष लखलाभ होवो. पण त्यांच्या फूट पाडणाऱ्या धोरणापासून सगळ्यांनी सावध राहा. ७० वर्षांपासूनची सवय इतक्या सहज मोडणार नाही”, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला आहे. इथे उद्गारवाचक भावना व्यक्त करणारे इमोजी मोदींनी वापरले आहेत.

“त्याचबरोबर, आत्ता जसा त्यांचा खोटा प्रचार, खोटे दावे गळून पडले, तसेच ते यापुढेही अनेकदा गळून पडल्याचं पाहण्याची वेळ जनतेवर येणार आहे”, असंही मोदींनी या पोस्टमध्ये शेवटी म्हटलं आहे. या वाक्यानंतर मोठ्याने हसल्याचे स्मायलीही वापरण्यात आले आहेत.

“बाळासाहेबांमुळे मोदींचं मुख्यमंत्रिपद वाचलं होतं, आज भाजपाचे नेते डोळे वटारुन…”, संजय राऊतांनी सांगितला तो प्रसंग!…

या पोस्टमागचं कारण काय?

वास्तविक आत्तापर्यंत नरेंद्र मोदींनी त्यांच्या खात्यावर केलेल्या पोस्टमध्ये कधीही इमोजींचा वापर केला नव्हता. शिवाय, एका वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदकांच्या पोस्टवर किंवा त्यांच्या व्हिडीओवर थेट पंतप्रधान व्यक्त होण्याची ही वेळ कदाचित पहिल्यांदाच आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या या पोस्टची चर्चा सुरू झाली आहे. काहींनी मोदींचं एक्स अकाऊंट हॅक झाल्याचीही चर्चा सुरू केली आहे. मात्र, सकाळी साडेदहाच्या सुमारास मोदींनी केलेल्या या पोस्टला हे वृत्त प्रकाशित होईपर्यंत १७ हजारांहून जास्त रीपोस्ट, ४८ हजाराहून जास्त लाईक्स आणि साडेपाच हजारांहून जास्त कमेंट्स आल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi x account post viral smiley emoji used targeting congress pmw