सायकल चालवणे हा एक उत्तम व्यायाम आहे. हात आणि पायासह शरीराच्या अनेक अवयवांचा सायकलिंगमुळे उत्तम व्यायाम होतो. त्यामुळेच दिवसाची सुरुवात सायकलिंगने करणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी आहे. मात्र अनेक महानगरांमध्ये सकाळच्या वेळी सायकल चालवणे वाहतुकीच्या समस्येत भर घालणारे ठरते. त्यामुळेच पोलंड सरकारने रात्रीच्या वेळी सायकलिंग करण्यासाठी एक खास मार्गिका तयार करण्यास सुरुवात केली आहे. रात्रीच्या वेळी कोण सायकलिंग करणार, हा लोकांच्या मनातील प्रश्न लक्षात घेऊन पोलंड सरकारने ही मार्गिका अतिशय आकर्षक करण्याचा निर्णय घेतला आहे.
रात्रीच्या अंधारात दिव्यांच्या मंद उजेडात सायकलिंगचा अनुभव अनेक पोलंडवासीयांनी घेतला आहे. मात्र आता पोलंडवासीयांना रात्रीच्या अंधारात चकाकत्या रस्त्यावरुन सायकलिंग करायला मिळणार आहे. लिडबार्क वारमिंस्की भागात सिथेंटिकचा वापर करुन रस्ता तयार केला जातो आहे. रात्रीच्या वेळी हा रस्ता चकाकणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकाराच्या विजेची आवश्यकता भासणार नाही. दिवसभर सूर्य किरणांमध्ये राहणारा हा रस्ता रात्री त्याच सूर्य किरणांच्या आधारे १० तास चमकत राहणार आहे.
या रस्त्यामुळे पोलंड सरकारने रात्रीच्या वेळी सायकलिंग करण्यासाठी नागरिकांना एक सुंदर कारण उपलब्ध करुन दिले आहे. कोणत्याही प्रकारच्या चार्जिंग आणि वीज पुरवठ्याशिवाय चकाकणाऱ्या या रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. याआधी नेदरलँडमध्ये अशा प्रकारचा चकाकणारा रस्ता तयार केला गेला होता. मात्र तो रस्ता एलईडीमुळे चकाकत होता. तर पोलंडमध्ये तयार होत असलेला रस्ता सिथेंटिकमुळे रात्रीच्या वेळी झळाळून निघणार आहे.
पर्यावरणपूरक असणारा हा रस्ता पाहून पोलंडवासी सध्या आनंदात आहे. या रस्त्यामुळे पर्यावणाची कोणतीही हानी होणार नाही. उलट यामुळे सायकलिंग करणाऱ्या अनेकांचा आनंद द्विगुणीत होणार आहे. शिवाय अनेकजण या रस्त्यामुळे रात्रीच्या वेळी सायकल चालवतील. त्यामुळे लोकांना चांगली सवय लागेल आणि त्यांचा व्यायाम होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून दिली जाते आहे.