Wedding Ceremony Viral Video : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका लग्नसोहळ्यात जोरदार भांडण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रात्रभर डीजे लावण्याची मागणी करणाऱ्या वऱ्हाड्यांना हॉटेल कर्मचाऱ्यांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली आहे. या गंभीर घटनेचा व्हिडीओ कॉंग्रेसच्या नेत्या डॉली शर्मा यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. सागर मलिक असं हॉटेल मालकाचं नाव असून सागरच्या वडिलांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा शर्मा यांनी केलाय. जर तुम्ही चांगल्या कुटुंबातील महिला आहेत, तर रात्री १२ वाजता कार्यक्रमात काय करत आहात? अशा शब्दात हॉटेल मालकाने वऱ्हाड्यांशी हुज्जत घातल्याचं शर्मा यांचं म्हणणं आहे. दरम्यान, याप्रकरणी ९ जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
व्हायरल व्हिडीओत शर्मा यांच्यासोबत एक तरुणी झालेल्या प्रकाराबाबत माहिती देतान दिसत आहे. तरुणीने शर्मा यांना सांगितलं की, “माझ्या भाऊला मारहाण करण्यात आली. त्याला गंभीर दुखापत झाली असून डोळ्यांजवळ १४ टाके मारण्यात आले आहेत. त्याला प्लास्टिक सर्जरी करण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आहे.” दुसऱ्या व्हायरल व्हिडीओत हॉटेल कर्मचारी गुंडांसारखे वागत असल्याचं दिसत आहे. कर्मचाऱ्यांच्या एका ग्रुपने लग्नसोहळ्यात उपस्थित असलेल्या पाहुण्यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तरुणी त्यांना वादविवाद करु नका, अशी विनंती करतानाही या व्हिडीओत दिसत आहे. द ग्रॅंड आयआरएस हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी डीजे लावण्यास नकार दिल्यानं दोन्ही गटात जोरदार भांडण झालं, अशी माहिती समोर आली आहे. या हाणामारीत एक महिलेसह पाच जण जखमी झाल्याचं समजते.
इथे पाहा व्हिडीओ
९ जणांना अटक
या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करुन ९ जणांना अटक केली. इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. डीसीपी रवी कुमार यांनी दिलेली माहिती अशी की, रात्री २ वाजताच्या सुमारास ग्रॅंड आयआरएस हॉटेलमध्ये वेडिंग पार्टी सुरु होती. रात्रभर डीजे लावण्याची मागणी काही लोकांनी केली. पण हॉटेल मालकाने डीजे लावण्यास नकार दिला. त्यानंतर जोरदार भांडण झालं. १५-२० हॉटेल कर्मचाऱ्यांनी पार्टीत सहभागी असलेल्या लोकांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.