लोकसत्ता प्रतिनिधी
Police Complaint File Against Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील अशी ख्याती असलेली नृत्यांगना म्हणजे गौतमी पाटील. याच गौतमी पाटीलच्या विरोधात सोलापूरमधल्या बार्शी पोलीस ठाण्यात आयोजकाने तक्रार दाखल केली आहे. गौतमी पाटीलने मानसिक त्रास देत फसवणूक केली अशी तक्रार कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी आता केली आहे.
नेमकं हे प्रकरण काय आहे?
अल्पावधीतच तरूणाच्या गळ्यातील ताईत बनलेली लावणी नृत्य कलावंत गौतमी पाटील हिचा लावणी महोत्सव बार्शी शहरात कोणतीही परवानगी न घेता आयोजित केल्याप्रकरणी संयोजकाविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे गौतमी पाटील व तिच्या सचिवाने आपली फसवणूक करून त्रास दिल्याचा आरोप संयोजकाने केला असून त्याबद्दलची तक्रार पोलिसांत दिली आहे.
गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार ?
राजेंद्र भगवान गायकवाड (रा. बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्या गौतमी पाटील हिच्या लावणी महोत्सव आयोजकाचे नाव आहे. गायकवाड यांनीही गौतमी पाटील व तिच्या सचिवाने आपली फसवणूक केल्याचा आरोप करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्जा दाखल केला आहे. या तक्रारीची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून यात गौतमी पाटील अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राजेंद्र गायकवाड यांनी बार्शी शहरात कुर्डूवाडी रस्त्यावर शेटे मळा या ठिकाणी गौतमी पाटील हिचा लावणी महोत्सव आयोजिला होता, त्यासाठी त्यांनी बार्शी शहर पोलिसांत सशुल्क पोलीस बंदोबस्तासह परवानगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु त्या अनुषंगाने लावणी महोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महोत्सव ठिकाणी महावितरणचे वीज पुरवठ्याबाबतचे प्रमाणपत्र, अग्निशामक आणि वैद्यकीय यंत्रणा आदींशी निगडीत बाबींची पूर्तता होण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र सादर करण्यास पोलिसांनी कळविले होते. या सर्व बाबींची पूर्तता आणि पोलीस बंदोबस्तासाठी शुल्क भरल्यानंतरच परवानगी मिळेल, असे स्पष्टपणे कळवून देखील गायकवाड यांनी कोणत्याही बाबींची पूर्तता न करताच बेकायदेशीरपणे लावणी महोत्सव भरविला. यात सार्वजनिक शांततेचा आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या जमावबंदीच्या आदेशाचाही भंग केल्याचा ठपका आयोजकावर ठेवण्यात आला आहे.
गौतमी पाटीलने मानसिक त्रास दिल्याची तक्रार
तथापि, दुसरीकडे याचा लावणी महोत्सवाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनीही गौतमी पाटील व तिच्या सचिवाने आपली फसवणूक करून मानसिक त्रास दिल्याचा आरोप करीत, गौतमी पाटील हिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याप्रमाणे त्यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे.