उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये पोलिसांच्या भरधाव जीपने गायीला वाचवण्याच्या नादात दोन लहान मुलांसह चार जणांना उडवले. यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
येथील हरिया परिसरात आज सकाळी उषा देवी या ६० वर्षांच्या महिला आपल्या नातवंडांसह रस्त्यालगत पायी जात होत्या. त्याचवेळी रस्त्यावरून पोलिसांची भरधाव जीप जात होती. चालकाचा जीपवरील ताबा सुटला आणि जीपने उषा यांच्यासह चौघांना उडवले. या अपघातात उषा यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या दोन नातींसह एक तरुण जखमी झाला आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून, पोलिसांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी जीपचालक राजकुमार मिश्र याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिषेक सिंह यांनी दिली.